Breaking News

मालगाडी घसरल्याने अजूनही वाहतूक विस्कळीतच, अनेक एक्सप्रेस रद्द

पुणे,दि.8 : मुंबईहून पुण्याकडे येणार्या रेल्वे मार्गावर मंकी हिल व खंडाळादरम्यान मालगाडीचे काही डबे गुरुवारी रुळावरुन घसरले. मालगाडीचे घसरलेले सहा डबे हटविण्याचे काम अद्याप सुरू आहे. यामुळे मुंबई-पुणे, व मुंबई-कोल्हापूरदरम्यानच्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या. ऐनवेळी रेल्वे रद्द झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले. मालगाडीचे डबे घसरल्यानंतर मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस कर्जत स्टेशनवरुन पुन्हा माघारी सीएसटीकडे रवाना करण्यात आली. मंकी हिल परिसर हा घाटाचा भाग आहे. त्यामुळे मालगाडीचे डबे हटविण्याच्या कामात मोठ्या अडचणी येत आहेत. रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, मुंबई-लातूर एक्स्प्रेस, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस या रेल्वे गुरुवारी रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे सिद्धेश्‍वर एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली. पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेसने पुण्याहून काही अंतर पार केले होते, मात्र ही रेल्वे पुणे स्टेशनवर मागे घेण्यात आली. रेल्वे प्रशासनाने रेल्वेंच्या वेळेत बदल केला असून काही रेल्वे अन्य मार्गे वळविण्यात आल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, मुंबईहून पुण्याला येणा-या रेल्वे गुरुवारी रद्द करण्यात आल्याने शुक्रवारी पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक दुपारी 4 वाजता ठप्प झाली. यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी, दादर, कल्याण, कर्जत एसटी आगारातून जादा एसटी बस सोडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना पर्याय उपलब्ध झाल्याने त्यांनी एसटीनेच प्रवास करणे पसंत केले. आजदेखील जादा एसटी सोडण्यात येतील, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.