Breaking News

भाषीय एकता महत्त्वाची : एस. एन. सुब्बाराव

जळगाव, दि. 16, सप्टेंबर - भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथील भाषा, वेशभुषा याबाबत जरी भिन्नता दिसत असली तरी ज्याप्रमाणे मोत्यांची माळ  दोर्‍यात गुंफली जाते तशीच देशाची भाषा सर्व भारतीयांना एकात्मतेच्या माळेत गुंफण्यास मदत करते, त्यामूळे भाषीय एकतेचे महत्त्व प्रखरपणे जाणवते, असे प्रतिपादन  ज्येष्ठ गांधीयन एस. एन. सुब्बाराव यांनी नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्पमध्ये युवकांशी संवाद साधतांना केले. या कॅम्पचा उद्या (ता. 15) समारोप होत आहे.
गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि गांधीयन सोसायटीच्या माध्यमातून नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्प गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात सुरू आहे. आज सकाळच्या  सत्रात ‘राष्ट्रीय एकात्मतेत युवकांची भुमिका’ या विषयावर ज्येष्ठ गांधीयन एस. एन. सुब्बाराव यांनी युवकांना मार्गदर्शन् केले. अठरा राज्यातील युवक-युवती यावेळी  उपस्थित होते.
या सत्राची सुरूवात ‘एक जगत की धरती माता’ या प्रेरणा गीताने झाली. युवकांची राष्ट्रीय एकात्मतेतील भुमिका सुब्बाराव यांनी विषद केली. समाजात युवकांनी  वावरतांना जबाबदारीने वागले पाहिजे. स्वस्थ समाज बनविण्यासाठी शासन मुक्त समाज होणे महत्त्वाचे असून यासाठी युवकांनी स्वप्रेरणेने पुढाकार घेतला पाहिजे.  आपआपसातील मतभेद मिटवून तडजोडीने जगले पाहिजे. तडजोडीच्या विचारातूनच आफ्रिकेमध्ये महात्मा गांधीजी यांनी परिवर्तन घडवून आणल्याचे सुब्बाराव  म्हणाले. प्रत्येकाला एकमेकांचा धर्माचा आदर असला पाहिजे. भाषेवार हिंसाचार टाळून आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, यातुनच राष्ट्रीय एकात्मता टिकेल.
यासाठी सरकारी कायद्यांची गरज नाही. फक्त युवकांनी मन संतुलित ठेवून अध्यनशिल, आत्मविश्‍वास, मानसिक, बौद्धीक शक्तीशाली व्हावे. यासाठी युवकांनी  सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असा मोलाचा सल्ला सुब्बाराव यांनी दिला. यानंतर डॉ. सुदर्शन यांनी युवकांना महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांचे विचार समजून  सांगितले. अश्‍विन झाला यांनी सुब्बाराव यांचा परिचय करून दिला. कॅम्पच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व गांधीयन सोसायटीचे सहकारी परिश्रम घेत  आहेत.
आज, शुक्रवार दि. 15 रोजी नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्पचा समारोप होईल. यावेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, ज्येष्ठ गांधीयन एस. एन.  सुब्बाराव, डॉ. सुदर्शन आयंगार उपस्थित राहतील.