Breaking News

कोणत्याही समस्येवर बुलेटने नाही, तर बॅलेटने तोडगा काढता येतो - उपराष्ट्रपती

रांची, दि. 10, सप्टेंबर - लोकशाहीत दहशतवाद्यांना हिंसाचार करण्याचा अधिकार नाही. कारण कोणत्याही समस्येवर बंदुकीच्या गोळीने (बुलेट) नाही, तर मतदान  पत्रिकेतूनच (बॅलेट) तोडगा काढता येतो, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले. रांची स्मार्ट सिटी योजनेच्या भूमीपूजनानंतर ते  बोलत होते.
हिंसाचार करणा-यांना कधीही प्रोत्साहन दिले जाऊ नये. प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. कारण विकासासाठी शांतता आवश्यक आहे. कोणत्याही  समस्येवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जाऊ शकते. त्यासाठी हिंसाचार करण्याची आवश्यकता नाही. लोकशाही जनताच सरकार चालवते. नागरिक मतदान करून  त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून देतात. त्यानंतर जनतेला अपेक्षित सरकार चालवले जाते, असेही नायडू म्हणाले.