Breaking News

तिसगावमध्ये राजकीय हालचालींना आला वेग

अहमदनगर, दि. 16, सप्टेंबर - तालूक्यातील राजकीयदृष्टया महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या तिसगाव ग्रामपंचायतीची निवडणुक जाहीर झाली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी व विरोधक दोन्हीही जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. थेट जनतेतून सरपंच होणार असल्याने अनेकांनी यासाठी तयारी चालवली आहे. तिसगाव ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षविरहीत होत असते. यावेळी मात्र पक्ष बाहेरुन रसद पुरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तिसगाव ग्रामपंचायतीची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. 
तिसगाव ग्रामपंचायतीवर गेल्या 50 वर्षापासून आजतागायत जेष्ठ नेते काशिनाथ लवांडे यांचे वर्चस्व राहिलेले आहे. एकूण 6 प्रभाग असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये 17 सदस्य आणी सरपंच अशा 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सरपंचपद हे खुल्या पुरुष या वर्गासाठी आहे. त्यामुळे अनेकांनी चाचपणी सुरु केली आहे. निवडणूक जाहीर होताच येथील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी गटातील एकहाती कमांड असलेले काशिनाथ लवांडे यांचा स्वच्छ कारभार आणि प्रत्येक ग्रामस्थांचे प्रश्‍न समजून घेऊन ते सोडविण्याची त्यांची पध्दत यामुळे तिसगाव ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांना कधीही यश आले नाही . या निवडणुकीमध्येही पाटील हेच सर्वेसर्वा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवण्याचा निर्णय या गटातील विश्‍वासू कार्यकत्यांनी घेतला आहे. तर विरोधी गटाकडूनही अनेकजण नेतृत्व करण्यास इच्छुक आहेत. त्यामध्ये भाउसाहेब लोखंडे व सेवा सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब लवांडे व नंदकुमार लोखंडे यांचा समावेश आहे. विरोधकांना या निवडणुकीत वरीष्ठ पातळीवरून मोठया अपेक्षा असल्याने नेतृत्व करायचे की नेतृत्व स्विकारायचे, हा मोठा पेच निर्माण झाला आहे.