Breaking News

पतंजलीला उच्च न्यायालयाचा झटका

नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - पतंजली आयुर्वैदच्या एका जाहिरातीवर दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. डेटॉल बनवणारी कंपनी रॅकिट बेनकीजरने या  प्रकरणी याचिका दाखल केली होती. योगगुरु रामदेव बाबांच्या कंपनीची ही जाहिरात रॅकिटच्या डेटॉल ब्रॅण्डची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप आहे. याआधी  हिंदुस्तान युनिलिव्हरनेही याचिकेद्वारे या जाहिरातीवर बंदी आणली होती. रॅकिट बेनकीजरनुसार, जाहिरातीमध्ये असा साबण दाखवलाय, जो आकाराने आणि रंगाने  आपल्याच उत्पादनासारखा आहे. शिवाय त्याचा उल्लेख ‘ढिटॉल’ म्हटलं आहे.
हायकोर्टाने या जाहिरातीवर अंतरिम बंदी घातली आहे. पतंजलीने सुरुवातीला ही जाहिरात यूट्यूबवर अपलोड केली, नंतर आयुर्वेद कंपनीने रविवारी या जाहिरातीचं  प्रसारण केलं. यासंदर्भात पाठवलेल्या ई-मेलला पतंजलीने उत्तर दिलं नाही, असं रॅकिट बेनकीजरच्या वकील नॅन्सी रॉय यांनी दिली. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने  हिंदुस्तान युनिलिव्हरच्या याचिकेवर सुनावणी करताना पतंजलीच्या या जाहिरातीवर पुढील सुनावणीपर्यंत बंदी घातली आहे.