Breaking News

लंडनमध्ये सातारकरांकडून गणेशोत्सव

सातारा, दि. 07 (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात डॉल्बी बंदीचा आदर्श निर्माण करणार्‍या सातारकरांनी आता सातासमुद्रापार जावून आपल्या उत्साहाचा झेंडा  अटकेपार रोवला आहे. ब्रिटन देशातील लंडनमध्ये यंदा गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक काढून भारतीयांनी आपल्या शिस्तबध्दतेचे दर्शन लंडनवासियांना दिले. विशेष  म्हणजे या मिरवणुकीचे व्यवस्थापन एका सातारकराकडेच होते.
हौनस्लोव भागातील भारतीयांच्या गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक वाजत-गाजत हळूहळू थेम्स नदीकडं सरकू लागली, तशी बघ्यांची संख्या वाढू लागली.  लंडनवासियांसाठी हा प्रकार अनोखा होता. आगळा-वेगळा होता. काहीजणांच्या चेहर्‍यावर आश्‍चर्य होतं तर काही जणांना उत्सुकता. व्हिक्टोरिया नामक एक वयस्कर  ब्रिटन महिलाही या मिरवणुकीत स्वत:हून सामील झाली. ढोलाच्या तालावर जसं जमेल तसं ठेका धरायचा प्रयत्न करू लागली. खरंतर, तिला हे जमत नव्हतं, तरीही  भारतीय गणेश भक्तांनी तिला चिअर-अप केलं. मग काय.. ब्रिटनच्या रक्तालाही जणू उधाण आलं. अस्सल मराठमोळ्या संगीतावर लंडनकरांचे पाय थिरकू लागले.  या मंडळासाठी भारतातून गणेशमूर्ती मागविण्याचा निर्णय झाला. मुंबईतल्या अनेक मूर्तिकारांची नावं पुढे आली होती. अनेकांकडून फोटो मागविले. अखेर एक सुबक  मूर्ती घेण्याचे निश्‍चित झाल्यानंतर मुंबईहून लंडनला मूर्ती व्यवस्थित पाठविण्याची जबाबदारी एका कुरिअर कंपनीवर सोपविण्यात आली.