Breaking News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात सातव्या क्रमांकावर

पुणे, दि. 07, सप्टेंबर - टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ या प्रतिष्ठेच्या मानांकनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात संयुक्तरीत्या सातवा  क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे पारंपारिक विद्यापीठांमध्ये ते देशात संयुक्तरीत्या पहिला क्रमांकावर आहे. पहिल्या सहा संस्थांमध्ये बंगळुरू येथील इंडियन  इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस आणि पाच आयआयटी यांचा समावेश आहे.
टाइम्स हायर एज्युकेशन’ यांच्या वतीने जगभरातील उच्चशिक्षण संस्थांच्या दर्जाचे मानांकन केले जाते. त्यानुसार पहिल्या एक हजार विद्यापीठांची नावे जाहीर केली  जातात. त्यात प्रामुख्याने अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार, आंतरराष्ट्रीय भान असे निकष पाहिले जातात. हे मानांकन जगभरात प्रतिष्ठेचे मानले जाते. या संस्थेने  2018 साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशातील इतर उच्चशिक्षण संस्था व विद्यापीठांच्या तुलनेत मोठी प्रगती साधली  आहे. अध्यापनाच्या (टिचिंग) निकषावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा देशातील सर्व विद्यापीठांमध्ये चौथा क्रमांक मिळाला आहे.
गेल्याच वर्षी नॅशनल इन्स्टिट्यूशलन रँकिंग फ्रेमवर्क’ने जाहीर केलेल्या (एनआयआरएफ) क्रमवारीत विद्यापीठाचा दहावा क्रमांक आला होता. आता विद्यापीठाने  आणखी प्रगती केल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याच मूल्यांकनात देशातील पारंपारिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2916 मध्ये  तिसरा, तर 2017 मध्ये दुसरा क्रमांक आला होता. त्यात सुधारणा होऊन आता 2018 साठी विद्यापीठाने संयुक्त पहिला क्रमांक पटकावला आहे. एकूण मूल्यांकनात  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला गेल्या वर्षी 27.5 गुण होते. त्यात वाढ होऊन यावर्षी 30.6 गुण मिळाले आहेत. तसेच, अध्यापन (टिचिंग), उद्योगांसोबतची  मिळकत, सायटेशन या निकषांमध्येही विद्यापीठाने यावर्षी प्रगती केली आहे.
भारतातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (आयआयएस्सी) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मुंबई, दिल्ली, कानपूर,  खरगपूर, रूर्की या पाच ठिकाणच्या इंडियन इन्स्टिट्यूज ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) यांचा समावेश आहे. सातव्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह  कानपूर, मद्रास, रूरकेला येथील आयआयटी, दिल्ली विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ, जादवपूर विद्यापीठ, इंडियन  स्कूल ऑफ माइन्स यांचा समावेश आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला देशात संयुक्त सातवा क्रमांक मिळाला, ही खूप आनंदाची बाब आहे. गेली दोन-तीन वर्षे आम्ही विविध बाबतीत सुधारणा करत  होतो. त्याचेच हे फलित आहे. आम्ही योग्य दिशेने काम करत आहोत, हे या अहवालातूनही पाहायला मिळाले आहे.’- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठ