Breaking News

हरणबारी धरणाच्या आरक्षणात फेरबदल करू नये - आ. दीपिका चव्हाण

नाशिक, दि. 14, सप्टेंबर - हरणबारी धरणाच्या आरक्षणात फेरबदल करू नये, असे आवाहन आ. दीपिका चव्हाण यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बागलाण विधानसभा मतदारसंघातील हरणबारी धरणाचे आरक्षण झालेले आहे. मालेगाव तालुक्यातील दहीकुटे पाझरतलाव क्षेत्रातील  ग्रामस्थांनी हरणबारी धरणातून पाणी सोडण्यासाठी आंदोलन केले होते. उपविभागीय अधिकारी मालेगाव यांना दहीकुटे पाझर तलावात मोसम नदीद्वारे हरणबारी  धरणातून पाणी सोडण्यासाठी आरक्षणाचा प्रस्ताव सादर करण्याचे आश्‍वासन संबंधित ग्रामस्थांना दिल्याचे समजते. हरणबारी धरणाची क्षमता 1166 दशलक्ष घनफूट  असून बागलाण व मालेगाव तालुक्यातील शेती सिंचनासाठी दोन वेळा 350 दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. उर्वरित साडेतीनशे दशलक्ष घनफूट पाणी  उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवले जाते. बागलाण तालुक्यातील मुल्हेर, अंतापूर, शेवरे, दसवेल, ताहाराबाद, पिंपळकोठे, भाताने, तांदुळवाडी,  सोनपूर, लाडूद, जायखेडा, वाडी पिसोळ, मेंढिपाडे, जयपूर, आनंदपूर, आखतवाडा, करजाड, नीताने, विजोटे, ब्राह्मणपाडे, वाघळे, उत्राने, द्याने, राजापूरपांडे,  खामलोण, आसखेडा गोराणे ,नामपूर, अंबासन, मोराने ,बिजोरसे, काकडगाव, सारदे व मालेगाव तालुक्यातील उमळवाड, वडनेर खाकुर्डी, कोठारे, वडेल, अंजग,  भायगाव, वजीरखेडे,काष्टी, डाबली, वडगाव आदी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या योजना मोसम नदीवर असल्याने वरील गावांना उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईच्या  काळात पाणी सोडले जाते. त्यामुळे हरणबारी धरणात कुठलाही पाणीसाठा शिल्लक राहत नाही.
बागलाण तालुका अवर्षणप्रवण तालुका आहे वरील सर्व गावांचा दहीकुटे पाझर तलावात पाणी सोडण्यासाठी विरोध आहे .त्यामुळे उपविभागीय अधिकारी मालेगाव  यांनी दहीकोटे पाझर तलावामध्ये पाणी सोडण्याच्या आरक्षणाच्या प्रस्तावाला मान्यता देऊ नये, याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही व्हावी ,अशी  मागणीही आमदार दीपिका चव्हाण निवेदनाद्वारे केली आहे.