Breaking News

गौरी लंकेशची हत्या सनातनी वृत्तीतून

दि. 07, सप्टेंबर - सर्वोच्च न्यायालयानं ज्या दिवशी गोरक्षकांबाबत केंद्र सरकारचे कान उपटले, त्याचदिवशी बेंगळुरूमधील पत्रकार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  गौरी लंकेश यांची हत्या व्हावी, हा दुर्दैवी योगायोग आहे. भाजपच्या नेत्यांच्या बदनामीप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल होते. त्याप्रकरणात न्यायालयानं त्यांना  शिक्षाही सुनावली आहे. त्यावरच्या अपिलात त्यांची जामिनावर सुटका झाली होती. पुढच्या न्यायालयात निकाल काय लागेल, याची संबंधीतांनी वाट पाहायला हवी  होती. तिथं निकाल विरोधात गेला, तर अपिलाची संधीही होती. केवळ उजव्या विचारांना विरोध करतात, म्हणून त्यांना संपवूनच टाकायचं, याला काही अर्थ नाही.  विचारांचा प्रतिवाद विचारांनीच करायचा असतो; परंतु विचार संपला आणि मांडण्यासारखं काही राहिलं नाही, की त्याची हत्या केली जाते. 
महात्मा गांधी यांच्यापासून ते चालत आलं आहे. देशात एक सनातन प्रवृत्ती आहे. विचारांंचा प्रतिवाद विचारांनीच करायचा असतो, हे त्या प्रवृत्तीला मानवत नाही.  पुण्यापासून बेंगळुरूपर्यंत गेल्या चार वर्षांत चार बुद्धीजीवी व्यक्तींच्या हत्या झाल्या. पुणे, कोल्हापूर, धारवाड आणि आता बेंगळूरू या चारही शहरांतील घटना  पाहिल्या, तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हा रक्ताळलेला आहे, असं वाटतं. देशात कायद्याचं राज्य आहे, की गुंडाचं? एखाद्याला एखादा विचार मान्य नसेलही;  त्याचा प्रतिवाद करण्याचा मार्गही विचारीच असायला हवा; परंतु हे मान्य नसलेले कायदाच हातात घेतात. त्यांचा भारतीय न्यायव्यवस्थेवर ही विश्‍वास नसतो.  कोणतीही हत्या ही वाईटच असते; परंतु आता हत्यांचं समर्थन करणार्‍यांचं प्रमाण वाढलं आहे. देशात हिंदुत्त्ववादी विचारांचं सरकार असलं, तरीही त्याला  घटनेनुसारच काम करावं लागतं. याचा विसर सरकारच्या पाठीराख्या असलेल्या काहींना पडला असून त्याच प्रवृत्ती आता कायदा हातात घ्यायला लागल्या आहेत.  त्यांचं असं धाडस होण्याचं कारणही तसंच आहे. सरकार आपल्या विचाराचं असल्यानं आपण काहीही केलं, तरी कायद्याचे हात आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत, असं  त्यांना ठामपणे वाटतं. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एस. कलबुर्गी यांच्या हत्या होऊन वर्षामागून वर्ष उलटत असली आणि न्यायालयं सरकारचे  वारंवार कानटोचणी करीत असली, तरी निर्ढावलेल्या तपास यंत्रणा आणि या तपासयंत्रणा ज्या सरकारच्या नेतृत्त्त्वाखाली काम करतात, ती सरकारं काहीच करायला  तयार नाहीत. खर्‍या आरोपीपर्यंत यंत्रणा अजूनही पोहोचल्या नाहीत. आरोपींना अटक करण्यात या यंत्रणांना खरंच रस आहे, की त्या चालढकल करून आरोपींना  पाठिशी घालीत आहेत, असा प्रश्‍न पडतो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टेक्नोसॅव्ही आहेत. त्यांनी तसं असायलाही हरकत नाही; परंतु हे करताना आपण  समाजमाध्यमांचा वापर पुरेशा गांभीर्यानं करतो का, हे ही पाहायला हवं. त्यातही गंभीर बाब म्हणजे गौरी लंकेश यांच्या हत्येचं ज्यानं समर्थन केलं, त्याला मोदी फॉलो  करीत असतील, तर तपास यंत्रणांनी त्यापासून काय बोध घ्यायचा?
गौरी लंकेश यांची हत्या कोणत्या कारणावरून झाली, याचा तपास सुरू असतानाच बेंगळुरू पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. गौरी लंकेश यांची  अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गीनंतर लंकेश यांची हत्या झाल्यानं देशभर खळबळ उडाली आहे.  देशात ठिकठिकाणी निषेध मोर्चे निघाले. लंकेश यांच्या हत्येच्या घटनेनंतर सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टच्या आधारावर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं  आहे. संदीप असं या तरुणाचं नाव असून त्याचा आणि हल्लेेखोरांचा नक्कीच काहीतरी संबंध आहे, असा पोलिसांना संशय आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी  जसं तणाव कमी करण्यासाठी कुणालाही ताब्यात घेतलं जात होतं, तसं तर आता होत नाही ना, यावर आता आंदोलन करणार्‍यांनी लक्ष ठेवायला हवं. लंकेश  आपल्या कारमधून उतरल्यानंतर घराचा दरवाजा उघडत असतानाच हल्लेेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असाव्यात. लंकेश यांच्या घरी तीन सीसीटीव्ही कॅमेरे  लावण्यात आले आहेत. त्यातील फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. लंकेश व कलबुर्गी यांच्या हत्यांचा परस्परांशी संबंध नसल्याचा दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या  घाईघाईनं करीत आहेत. त्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक स्थापन केलं आहे. या पथकाला काही निष्कर्षापर्यंत पोचण्याआधीच मुख्यमंत्र्यांना  निष्कर्ष जाहीर करण्याची घाई का झाली आहे? लंकेश यांच्या हत्येच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून लंकेश यांच्या कुटुबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी  केली आहे. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपासही राज्याच्या पोलिसांनी केला होता; पण अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत ते पोहोचले नाहीत. त्यामुळं लंकेश यांच्या  हत्येच्या तपासाची गतही तशीच होईल, अशी भीती लंकेश यांच्या बंधूंनी व्यक्त केली आहे. गौरी एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांना कोणतीही धमकी मिळाली  नव्हती. या संपूर्ण घटनेचं चित्रण सीसीटीव्हीत कैद झालं आहे. ते मला आणि माझ्या आईला दाखवण्यात यावं, अशी मागणी त्यांचे बंधू इंद्रजित यांनी बेंगळुरू  पोलिसांकडे केली आहे.
गौरी लंकेश या उजवी विचारसरणी व हिंदुत्ववादी राजकारणाच्या कडव्या समीक्षक म्हणून ओळखल्या जातात. कन्नडमध्ये प्रकाशित होणार्‍या गौरी लंकेश पत्रिके या  साप्ताहिकाच्या त्या संपादक होत्या. या साप्ताहिकाची स्थापना गौरी लंकेश यांचे वडील पी. लंकेश यांनी 1960 मध्ये केली होती. ते कवी आणि लेखक होते. लंकेश  पत्रिकेची ओळख सुरुवातीपासूनच व्यवस्थाविरोधी, जातव्यवस्थाविरोधी आणि धर्मनिरपेक्ष विचारांचा पुरस्कार करणारे, अशी होती. संपादक बनल्यानंतर गौरी लंकेश  प्रस्थापित व्यवस्थेविरोधात, धर्माच्या सकुंचित राजकारणाची कठोर समीक्षा करणारे लेख लिहिले. विशेष म्हणजे या पत्रिकेद्वारे शासन किंवा इतर कोणाकडूनही  जाहिरात घेतल्या जात नसत. त्यांचा शेवटचा लेख, कशा प्रकारे खोट्या बातम्या पसरवून समाजात धार्मिक तणाव निर्माण केला जातो, याविषयी होता. माध्यम  स्वांतत्र्यांवर येणार्‍या निर्बंंधाविरोधातही त्या सातत्यानं आवाज उठवत असत.