Breaking News

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू पकडला

बुलडाणा, दि. 16, सप्टेंबर - चिखली वरून वाशीमकडे जाणार्‍या सार्वजनिक वितरण प्रणालीचा 19 टन 490 क्विंटल गहू जप्त करण्यात आला आहे. ट्रक व एक स्वीफ्ट डीझायर यांच्यासह तीन जणांना ताब्यात घेऊन 25 लाख 61 हजार 820 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कार्यवाही आज 14 सप्टेंबर रोजी करण्यात आली. 
स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन आज 14 सप्टेंबर रोजी केदारे यांनी ससेमिरा करीत लव्हाळा फाट्यावर ट्रक क्र.एम. एच. 37 जे 4663 हा ट्रक अडविण्यात आला. या ट्रकची तपासणी केल्यानंतर ट्रकमध्ये 19 टन 490 क्विंटल गहू असल्याचे आढळून आले.
हा गहू सार्वजनिक वितरण प्रणालीचा असल्यामुळे पोलिसांनी कार्यवाहीला सुरुवात केली. दरम्यान गहू काळया बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या ट्रक सोबत एक स्वीफ्ट डीझायर क्र. एम. एच. 28 ए. एन. 2117 ही असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सदर कारला अडवून चालक व कारला ताब्यात घेतले. या कार्यवाहीत मो. फारूक मो. इब्राहिम रा वाशीम, वजीद मिर्झा युसूफ मिर्झा रा. वाशीम,अल्ताफ अजीज कच्छी रा.चिखली, प्रकाश सखाराम कुडके रा. चिखली या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे सहा पोलिस निरीक्षक मनोज केदारे, डिगांबर अंभोरे, विकास खानजोडे, राजु ठाकूर, योगेश सरोदे, गजानन जाधव यांनी केली आहे. दरम्यान आरोपींविरुद्ध अ. प. न. 212/017 कलम 37 अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल आला 3 लाख 50 हजार 820 रुपयाचा गहू, 14 लाखाचा ट्रक व 7 लाख किमतीची कार व 11 हजाराचे 3 मोबाईल, असा एकूण 25,61.820 रूपायाचा ऐवज जप्त केला आहे.