Breaking News

आमचा हनुमान सत्तेच्या लंकेतच रमला - राजू शेट्टी

सांगली, दि. 07, सप्टेंबर - शेतक-यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आमचा हनुमान असलेल्या सदाभाऊ खोत यांना भारतीय जनता पक्षाच्या लंकेत पाठविले होते. परंतु आमचा हनुमान सीतेला मुक्त करण्याऐवजी लंकेतील सत्तेतच रममाण झाला, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी अप्रत्यक्षरित्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात आपल्या पुढे आव्हान उभे करण्याची भाषा केली होती. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून आपल्याविरोधात कोणालाही उभे करा. त्याला धडा शिकविण्याची हिंमत आपल्यात आहे, असे वक्तव्य करून राजू शेट्टी म्हणाले, की आपल्या मतदारसंघातीलच नव्हे, तर राज्यातील शेतकरी व जनता आपल्या पाठिशी आहे. त्यामुळे या मतदारसंघात आव्हान देण्याची भाषा कोणी करू नये, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला.
सांगली जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपबरोबरीनेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आपण चांगली अद्दल घडवली आहे. आपल्या रयत विकास आघाडीच्यावतीने उभ्या केलेल्या श्रीमती सुरेखा आडमुठे यांना विजयी करण्यात आपल्याला यश आले आहे. नियोजन समितीचे उमेदवार निश्‍चित करताना आपल्यासह रयत विकास आघाडीच्या अन्य कोणत्याही नेत्यास भाजप नेत्यांनी विचारात घेतले नव्हते. इतकेच नव्हे, तर आपला केवळ एकच सदस्य असल्याने उमेदवारी कशाला द्यायची, अशीच प्रतिक्रिया भाजप नेत्यांची होती. मात्र नियोजन समितीच्या निवडणुकीत आम्ही चमत्कार घडवून यापुढील कालावधीत आमची दखल घेण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे आता तरी दक्षिण महाराष्ट्रात भाजपने राजकीय आतातयीपणा करू नये, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.