Breaking News

नारायणगावात गणेशमूर्तींसह तीन टन निर्माल्याचे संकलन

अहमदनगर, दि. 07, सप्टेंबर - रोटरी क्लब नारायणगाव व ग्रामोन्नती मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच ग्रामपंचायत नारायणगाव व  ग्रामपंचायत वारूळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने  गणेश विसर्जन व मिरवणूकी दरम्यान तीन टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले. तसेच गणेश भक्तांना गणेश मूर्तींचे  दान करण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत भाविकांनी 435 गणेश मूर्तींचे स्वेच्छेने दान केले.
गेली 5 वर्षांपासून सुरु असलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष डॉ. प्रशांत काचळे यांनी गणेश विसर्जनाच्या वेळी  मीना नदीचे जल प्रदूषण होऊ नये यासाठी संकलित निर्माल्याचे काम्पोस्ट खत निर्मिती केली जाईल.तसेच ओला व सुखे निर्माल्याचे वर्गीकरण करून योग्य उपयोग  करण्याचे आवाहन नागरिकांना केले. महाविद्यालायाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे म्हणाले की, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मागील 5 वर्षापासून  ग्रामपंचायत  नारायणगाव, वारूळवाडी, रोटरी क्लब नारायणगाव तसेच रा. से. योजनेतील स्वयंसेवक यांच्या माध्यमातून मीना नदीचे जलप्रदूषण होऊ नये यासाठी  महाविद्यालय व समाज विकासाची सांगड घालण्याच्या हेतूने जनजागृतीचे हे विधायक कार्य करीत असतात.त्यासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे नदी  पात्रातील जलप्रदूषण काही अंशी कमी होण्यास मदत होते.राष्ट्रीय सेवा योजनेतील 45 स्वयंसेवकांनी सकाळी 8 ते रात्री  9 वाजेपर्यंत गणेश विसर्जनाच्या वेळी  नागरिकांना आव्हान करून 3 टन निर्माल्याचे संकलन केले. ग्रामपंचायत  नारायणगाव, वारूळवाडी व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी निर्माल्य संकलनासाठी  वाहन उपलब्धता करून दिली.  निर्माल्य संकलन उपक्रमासाठी रोटरी क्लब नारायणगावचे डॉ. आनंद कुलकर्णी, संजीव कुलकर्णी, संजय मालानी, मिलिंद घोडेकर,  प्रदीप पवार, डॉ. श्रीकांत फुलसुंदर, डॉ. लहू गायकवाड, प्रा. स्वप्नील कांबळे, प्रा. नानासाहेब शेळके, प्रा. सौ. वैशाली मोढवे, श्री विजय कोल्हे यांनी नियोजन केले  होते तर राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयसेवक सागर कसबे, पूजा मानव, भरत मुळे, शुभम शिंदे, सौरभ शिंदे, रोशन चवरे, कोमल गोरडे, आरती घाडगे,  शिवानी महाजन आदी  स्वयंसेवाकानी विशेष सहकार्य केले आहे. तसेच नियंत्रण कक्ष म्हणून सहाय्यक पोलीस निरिक्षक अजय गोरड, पो.कॉ.जांभळे यांनी विशेष  सहकार्य केले.