Breaking News

अतिदुर्मिळ असलेल्या ‘अल्बिनो पहाडी तस्कर’ सापावरील केलेल्या संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर नोंद

सातारा, दि. 14, सप्टेंबर - खंडाळा येथील वाईल्ड लाईफ रेस्क्यू असोसिएशनने अतिदुर्मिळ असलेल्या ‘अल्बिनो पहाडी तस्कर’ सापावरील केलेल्या संशोधनाची  राष्ट्रीय पातळीवर नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा प्रबंध चेन्नई येथील कोब्रा शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध केला असल्याने ग्रामीण भागातील संशोधनाला राष्ट्रीय  पातळीवर स्थान मिळाले आहे .
महाबळेश्‍वर येथील एका घराच्या परिसरात आगळ्या-वेगळ्या प्रकारचा साप आढळून आला होता. घरमालकाने सर्पमित्र अक्षय गायकवाड व प्रदीप सोनवणे यांच्याशी  संपर्क साधून त्यांना या सापाची माहिती दिली. यानंतर सर्पमित्रांनी महाबळेश्‍वर येथे येऊन हा साप पकडला.
पकडलेल्या सापाचा वेगळेपणा लक्षात आल्याने सर्पमित्रांनी खंडाळा येथील वाईल्ड लाईफ रेस्क्यू असोसिएशनचे रवि पवार व राहुल तायडे यांना बोलावून त्यांना या  सापाची पाहणी करण्यास सांगितले.
पाहणीनंतर हा साप अतिदुर्मिळ ‘अल्बिनो पहाडी तस्कर’ प्रजातीचा असल्याची माहिती समोर आली. वन विभागाकडे नोंदणी, मोजमाप व इतर पाहणी करून सापाला  त्याच्या अधिवासात सोडण्यात आले.हा साप बिनविषारी असला तरी अतिदुर्मिळ असल्याने या सापाची नोंद इंडियन हरपेटोलॉजिकल सोसायटीकडे करण्यात आली.  याबाबत तयार केलेला प्रबंध चेन्नई येथील कोब्रा शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध केला असल्याने ग्रामीण भागातील संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळाले आहे.