Breaking News

अंत्योदय हीच शिकवण व ध्येय : नितीन गडकरी


नागपूर,दि.17  : जागतिक वैचारिक विश्‍व व्यापून टाकणार्‍या विचारधारांमध्ये पं. दीनदयाल उपाध्याय यांनी प्रतिपादित केलेला एकात्म मानवतावाद हा अंत्योदयावर आधारित आहे. हा समाजातील शेवटच्या घटकांचा विकास मांडणारा अंत्योदय हीच आमची शिकवण आणि ध्येय असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात आयोजित पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावर आधारित नाटकाच्या प्रयोग प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी गडकरी म्हणाले की, व्यक्ती पेक्षा संघटना आणि संघटनेहून विचारधारा श्रेष्ठ असल्याचे वैचारिक चिंतन पं. दीनदयाल उपाध्याय यांनी मांडले होते. समाजातील शेवटच्या माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवून त्यांचा वैचारिक वारसा जपण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. जगात समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही या विचारधारांचे प्राबल्य होते. समाजवादाची शकलं पडलीत. साम्यवाद उन्मळून पडलाय आणि भांडवलशाहीला पर्याय शोधले जात आहेत. यापार्श्‍वभूमीवर दीनदयाल उपाध्याय यांचा भारतीय समाजाला डोळ्यापुढे ठेवून आखलेले एकात्म मानवतावदाचे तत्वज्ञान आजही काळानुरूप आहे. राज्य व केंद्र सरकार त्यावर मार्गक्रमण करीत आहे. देशात 3 कोटीहून 30 कोटींपर्यंत गेलेली जनधन खाती, ई-रिक्षा ही त्याची उदाहरणे आहेत.
 थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पहा जरा ॥
आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा ्॥
या मराठी कवितेच्या भावार्थानुसार दीनदयाल उपाध्याय यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या शिकवणीला जीवनात उतरवण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक घटक जगवा यासाठी समाजाने तशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. प्रत्येकाला जगण्यानुकूल व्यवस्था देणे आणि अंत्योदय करणे ही आपली जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.