Breaking News

मुलांच्या मागे सह्याद्रीसारखे उभे राहिल्यास नवभारत निर्माण होईल

। मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचे प्रतिपादन 

अहमदनगर, दि. 07, सप्टेंबर - पालकांनी मुलांवर बंधने घालण्याऐवजी त्यांंच्या चांगल्या कर्तृत्वाला प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलांच्या मागे सह्याद्रीसारखे उभे  राहिल्यास नवभारत निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असा विश्‍वास मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला. 
मराठा सेवा संघ स्थापनेला 27 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल शिर्डी येथे शिवसन्मान पुरस्कार कार्यक्रमात खेडेकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई  विखे पाटील, साई संस्थानचे विश्‍वस्त तथा माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नगराध्यक्षा योगिताताई शेळके, शिर्डीचे नगराध्यक्ष कैलासबापु  कोते, प्रदेश  कार्यकारणी सदस्य शरदराव निमसे, चंद्रकांत नवले, सोपानराव मुळे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, मराठा सेवा संघाचे  जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ, सचिव अतुल लहारे, डॉ.ज्ञानेश्‍वर गांगर्डे, सोमनाथ नवले, डॉ.संदिप कडलग, गंगाधर बनबरे, शिवानंद भानुसे, अमोल मिटकरी, संतोष  शिंदे, इंजि.चेतन पवार, योगशराव निसाळ, राजमाता जिजाऊ चित्रपटाच्या निर्मात्या मंदाताई निमसे, सुमनताई वाबळे, छायाताई दंडवते, अनुताई लोंढे, अंतरराष्ट्रीय  योगा स्पर्धेत थायलंड, श्रीलंका आदी ठिकणी गोल्डमेडल प्राप्त असलेली आश्‍विनी काळे, सोमनाथ नवले, संभाजी ब्रिगेडचे दशरथ गव्हाणे, गोरख दळवी, प्रकाश  कराळे, संदिप खर्डे, राजेंद्र खोजे, गुणवंत आठरे, डॉ.संदिप कडलग, विशाल भडांगे अदीसह मान्यवर उपस्थित होते.
खेडेकर म्हणाले की,  आज शिक्षणसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता प्रबळ होत आहे. मात्र माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. पुर्वी  घर लहान; पण एकत्र व  आनंदी कुंटुब होते. आज घर मोठे झाले पण कुटुंब विखुरली. त्यामुळे कुटुंबातील संवाद संपला आहे. सध्याचे 21 वे शतक हे माहितीतंत्रज्ञानाचे आहे. 21 व्या  शतकात तरुणांनी विज्ञानाची कास धरावी. कर्मकांड आणि दानधर्माला बाजुला सारुन प्रगतीकडे  वाटचाल  करावी. त्यासाठी छत्रपती शिवरायांच्या  विश्‍वबंधुत्वाच्या  विचारांचे अनुकरण करावे.   आजच्या पिढीला महामानवांचे विचारच तारु शकतात. महामानवांच्या विचारांचे अनुकरण करुन त्यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत  पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन खेडेकर यांनी केले.