Breaking News

हिवरा आश्रमाने साहित्य संमेलन नाकारावे - डॉ. सबनीस

पुणे, दि. 15, सप्टेंबर - आगामी 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणावरून निर्माण झालेल्या वादामुळे बुलडाण्यातील हिवरा येथील स्वामी  विवेकानंद आश्रमाची आणि विवेकानंदांच्या नावाची बदनामी होत आहे. त्यामुळे हिवरा आश्रमाने हे साहित्य संमेलन विनम्रपणे नाकारावे, असे मत माजी संमेलनाध्यक्ष  डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या नावाने त्यांच्या विचारांचे स्वतंत्र साहित्य संमेलन घ्यावे. साहित्य महामंडळानेही लोकशाही प्रक्रियेला सुसंगत अशी भूमिका घेऊन दुसरीकडे  संमेलन आयोजित करावे, असेही सबनीस म्हणाले.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने साहित्य संमेलनाच्या स्थळावर आक्षेप घेत संमेलनाचे ठिकाण  बदलण्याची मागणी केली. त्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमिवर डॉ. सबनीस बोलत होते.
ते म्हणाले, अ. भा. म. साहित्य महामंडळाने त्यांच्या पद्धतीप्रमाणे हिवरा येथील स्वामी विवेकानंद आश्रमास साहित्य संमेलन घेण्याची संधी दिली आहे. त्यानंतर  संमेलनाच्या स्थळावरून काही वाद निर्माण झाले. आश्रमातील महाराजांच्या संदर्भात अंनिसचे शाम मानव यांनी 30 वर्षांपूर्वी काही लेखन केले होते. ज्या महाराजांच्या  संदर्भात हा वाद उपस्थित केला गेला होता, त्या महाराजांनी शाम मानव यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा अकोला येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला  होता. या दाव्याचा निकाल देताना न्यायालयाने शाम मानव यांना महाराजांची व आश्रमाची बदनामी करू नये, अशी ताकीद दिली होती. तसेच दाव्याचा खर्च  महाराजांना देण्याचाही आदेश दिला होता.
संबंधीत महाराजांसंदर्भात मला कोणतीही चांगली - वाईट माहिती नाही. मात्र हिवर्याचा आश्रम हा स्वामी विवेकानंदांच्या नावाचा आहे. स्वामी विवेकानंद हे अंधश्रद्धा  मानणारे नव्हते. ते अंधश्रद्धेच्या विरोधात होते. महामंडळ आणि महामंडळाचे सदस्यही अंधश्रद्धेच्या विरोधात आहेत. वादग्रस्त ठिकाणी संमेलन होऊ नये, म्हणून शाम  मानव यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भूमिका घेतली आहे. या गोष्टीवरून संपूर्ण महाराष्ट्रात वादाचे वातावरण निर्माण झाले.
साधारण दोन - तीन महिन्यापासून साहित्य संमेलनासाठी बुलडाण्याचे नाव चर्चेत होते. त्यावेळी अंनिसने आणि शाम मानव यांनी हा प्रश्‍न संवादाच्या माध्यमातून  समोर आणला असता, तर साहित्य संमेलनाच्या ठिकाणासंदर्भात महामंडळास पर्याय शोधता आला असता. महामंडळाने आश्रमास संधी न देता, ते संमेलन दुसरीकडे  वळविले असते.
न्यायालयाचा आणि महामंडळातील लोकशाहीचा सन्मान करण्याच्या दृष्टीने या वादावर तोडगा काढायला हवा. या वादामुळे स्वामी विवेकानंद यांच्या नावाची बदनामी  होत आहे. म्हणून येणारे संमेलन आश्रमाने नम्रपणे नाकारावे आणि स्वामी विवेकानंद यांच्या नावाने त्यांच्या विचाराचे स्वतंत्र साहित्य संमेलन घ्यावे. हे संमेलन  आश्रमापुरते मर्यादित ठेवावे. तसेच महामंडळास इतर ठिकाणी संमेलन घेण्यास परवानगी द्यावी. महामंडळानेही लोकशाही प्रक्रियेला सुसंगत अशी भूमिका घेऊन  दुसरीकडे संमेलन द्यावे, असे स्पष्ट मत सबनीस यांनी मांडले.