Breaking News

संग्रामपूर पं.स. कार्यालयात निम्मे कर्मचार्‍यांची पदे रिक्त - विकास कामांना खिळ

बुलडाणा, दि. 16, सप्टेंबर - पंचायतराज व्यवस्थेत तालुक्याचे विकासाकरिता महत्वाची भूमिका असणार्‍या येथील पं.स.प्रशासनाला रिक्त पदांचे ग्रहण लागले असून मंजुर पदांपैकी चक्क निम्मे पद रिक्त आहेत. यामुळे विकासकामांना खिळ बसली असून रिक्त पदे भरा अशी मागणी तालुकावासी करीत आहे. 
संग्रामपूर पं.स.मध्ये 38 पद मंजुर असून त्यातील 19 पदे रिक्त आहेत. त्यामुळे पं.स. प्रशासनाचा कारभार निव्वळ रामभरोसे सुरु आहे. रिक्त पदांमध्ये पुढील जागांचा समावेश आहे. यात सहा.लेखाधिकारी, विस्तार अधिकारी आरोग्य, विस्तार अधिकारी उद्योग, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, लिपीक कनिष्ठ या संवर्गातील प्रत्येकी एक पद रिक्त आहे. क.स.लिपीक वर्गाचे मंजूर पद 12 असताना फक्त आठ पदे भरली तर तब्बल चार पदे रिक्त आहेत. परिचारकचे 7 मंजुर पद आहेत तर तीन पद भरली असून चार पद रिक्त आहेत.
या रिक्त पदामुळे तालुक्याचा विकास खुंटला असून रिक्त पदामुळे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामांचा बोजा पडत असल्यामुळे ते कर्मचारी त्रस्त दिसून येतात. याकडे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे जणेकरुन कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांचा कामाचा अतिरिक्त बोजा कमी होईल.