Breaking News

सत्तेत असताना वाईट काळ अनुभवला : एकनाथ खडसे


पुणे, दि.17  : माझ्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी 8 मुख्यमंत्री पाहिले. संघर्षमय जीवन जगत राजकीय प्रवास केला. अनेक खात्यांवरील विविध पदे भूषविली. मात्र विरोधात असताना नाहीतर सत्तेत असताना गेल्या काही महिन्यांपासून मी वाईट काळ अनुभवला. माझ्यावर अचानक आरोप झाले त्यांची चौकशी ही झाली, अशी खदखद माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. तसेच केलेल्या आरोपात तथ्य आढळले नसून आता मी पुढील आरोपांची वाट पहात आहे, असेही ते म्हणाले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्च्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार एकनाथ खडसे यांना
प्रदान करण्यात आला. यावेळी जनता दल (यु) चे मुख्य महासचिव के.सी.त्यागी, आमदार भीमराव तापकीर, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. यावेळी इन्स्टिटयूट ऑफ सायन्सचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एन.सी.जोशी यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, ग्रंथ असे पुरस्कारांचे स्वरुप होते. एकनाथ खडसे म्हणाले, जीवनगौरव पुरस्कार म्हणजे त्या क्षेत्रातून निवृत्तीअसे अनेकांना वाटते. मात्र, हा पुरस्कार म्हणजे माझी निवृत्ती नसून नवी सुरुवात आहे. इतरांनी यामाध्यमातून माझ्या चांगल्या कामाचे मूल्यमापन केले असल्याने कष्टाचे फलित झाल्यासारखे वाटते. त्याकाळी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाने व कष्टाने भाजपाचे सरकार आत्ता सत्तेत आले. आज गोपीनाथ मुंडे असते, तर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली असती. ते पुढे म्हणाले, राजकारणात चांगल्या प्रवृत्ती व विचार येत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ राजकारण होणार नाही. राजकारणात शब्दावर पक्के न राहणारे अनेक लोक मी अनुभविले आहेत. सध्या हिंदुस्थान हा एकमेव देश असा आहे की, ज्याची धर्मशाळा झाली आहे. बाहेरील देशातून येथे अनेकजण येतात, त्यांना नागरिकत्त्व दिले जाते. तेच लोक हिंसाचार करतात. त्यामुळे अशांना देशाबाहेर काढायला हवे. अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये बल, बुद्धी आणि सद्विचार रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंना पुरस्काराने गौरविण्यात येते.यावेळी के.सी.त्यागी, सुरेश चव्हाणके, भीमराव तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर यांनी आभार मानले.