Breaking News

देशातील जातीभेद, सांप्रदायिकता भारताला रसातळाला नेणारी

ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांचे बंधुभाव संमेलनात प्रतिपादन

बुलडाणा, दि. 16, सप्टेंबर - आज देशभरात सांप्रदायिकता, धर्मांधता, वंशवाद, जातीय भेद, प्रांतभेद, लिंगभेदाद्वारे द्वेष व घृणेचे वातावरण जाणीवपुर्वक तयार करुन भारताला रसातळाला नेण्यात येत असल्याचे प्रतिपादन ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी चिखली येथील बंधुभाव संमेलन प्रसंगी काल केले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबुराव पाटील हे होते. तर प्रमुख उपस्थिती माजी आमदार जनुभाऊ बोंद्रे, संविधान मोर्चाचे जिल्हा संयोजक प्रशांत सोनोने, जय जवान जय किसानचे प्रदेश सचिव फौजी अरुण गवई, क्रांती युवा मंचचे सचिव डॉ.गुफरान खान,बामसेफचे राजेश गवई, प्रा.पी.जी.सवडतकर, अर्चनाताई थोबाडे, रविंद्र डाळीमकर, डॉ.जे.जे.जाधव, नितेश थिगळे, अ‍ॅड.दिनेश जपे, अ‍ॅड.पवार ,धनंजय शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.पुढे बोलतांना सावंत म्हणाले की, आज जे भेदाभेदाचे वातावरण आहे. त्याला संपविण्यासाठी व एकसंघ राष्ट्रभावना वाढविण्यासाठी सिंवधानात्मक स्वातंत्रय समता, न्याय व बंधुत्व या मुल्यांची नितांत आवश्यकता आहे. करिता येणार्‍या काळात या देशात बंधुभाव वाढविण्यासाठी संविधान मोर्चामार्फत  जिल्हास्तरीय बंधुत्व संमेलन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्रशांत सोनोने म्हणाले की, प्रेम अहिंसा, सदभाव, बंधुत्व, सामाजिकता व सामुहिकता ही शाश्‍वत नैतिकमुल्य म्हणजे मानवी मुल्यरत्न होत.या प्रसंगी अभिव्यक्ती स्वातंत्रयावर जे हल्ले होत आहेत. व विचारवंताचे खुन करुन विचार संपविण्याचे प्रयत्न होत आहे. त्याबद्दल या संमेलनात निषेधाचा ठराव पारित करण्यात आला व पत्रकार गौरी लंकेश यांनाही श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी झिरो बजेट शेती, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, बेरोजगारी आदी ज्वलंत प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन राजेश गवई यांनी केले.