Breaking News

लक्ष्मण राव यांना पद्मश्री देण्याची दिल्ली मराठी प्रतिष्ठानची मागणी

नवी दिल्ली, दि. 16, सप्टेंबर - ज्येष्ठ हिंदी साहित्यिक लक्ष्मण राव यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस दिल्ली मराठी प्रतिष्ठानने केली आहे. या  संदर्भात प्रतिष्ठानने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र पाठवले आहे. ही माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रमोद मुजुमदार यांनी दिली . 
मूळचे हैदराबाद अमरावतीचे असणारे श्री . राव हे गेल्या 40 वर्षांपासून दिल्लीत रहात आहेत. गरीबीमुळे राव यांना आपले गाव सोडून दिल्लीत यावे लागले . अत्यंत  हलाखीची स्थिती असल्याने दिल्ली रेल्वे स्थानकावर त्यांना आसरा घ्यावा लागला . दिल्लीत हिंदी भवनजवळ पदपथावर चहा विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे . त्याच  बरोबर याठिकाणी ते आपली पुस्तकेही विकतात. त्यांनी आतापर्यंत 25 हिंदी पुस्तके लिहिली आहेत . आपल्या कथा , कादंबर्‍या सायकलवर शाळांमध्ये जाऊन  विकल्या आहेत. अशा या अनोख्या व्यक्तिमत्वाची दखल देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांनीही दखल घेतली आहे. अनेक वृत्तपत्र , साप्ताहिके ,  मासिके तसेच काही विदेशी वाहिन्यांनी राव यांच्या जीवन कहाणीला प्रसिद्धी दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी एनडीटीव्ही वरील वॉक द टॉक या  कार्यक्रमात राव यांची मुलाखत घेतली होती. अशा व्यक्तिमत्वाचा पद्मश्री देऊन गौरव होणे उचित ठरेल असे राजनाथ सिंग यांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात  आले आहे.