Breaking News

दरोड्याच्या तयारीत असणार्‍या नऊ जणांना पोलिसांनी कोंम्बिंग ऑपरेशन करुन ताब्यात घेतले

अहमदनगर, दि. 14, सप्टेंबर - तालुक्यातील बेलवंडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत अज्ञात इसमांकडून दरोडा टाकण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिस  उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांना गुप्त माहितगाराकडून मिळाली. त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास विसापूर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले असता या कारवाईत  दरोड्याच्या तयारीत असलेल्या 9 जण आढळून आले.
या कारवाईत दरोड्यासाठी लागणारे मिरची पूर्ण नायलॉन दोरी सुरा कोयता आदी साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान, या आरोपीकडून श्रीगोंदा तालुक्यात यापूर्वी पडलेल्या दरोड्याच्या घटनांची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत लंगडया अंकुश  काळे, अशोक आळशीराम काळे, पिन्या अंकुश काळे, निमकर अर्जुन काळे रा. रांजनगाव मशीद, ता. पारनेर, अविनाश रमेश काळे वय-22, रा. मोरवाडी कोळगाव,   छत्रुगन त्रिंबक भोसले, वय - 42, रा. निमगाव खलू, जयश्र्या अंकुश काळे वय- 50, रा. रांजनगाव मशीद,  ता. पारनेर  यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात भादंवि 399 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या  मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिवरकर हे करत आहेत. दरम्यान, या कारवाईचे तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे.