0
पुणे, दि. 16, सप्टेंबर - ’गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम केल्यानंतर समजले, की काश्मीर इतकाच नक्षलवादाचा प्रश्‍न गंभीर आहे. तो संपवण्यासाठी  प्रयत्न केले पाहिजेत. नक्षलवाद आणि गुन्हेगारीसारखे प्रश्‍न सोडवायचे असतील तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रथम प्रयत्न केले पाहिजेत’, असे  मत नक्षलग्रस्त भागात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्मरणार्थ  व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नक्षलवाद आणि उपाय या विषयावर जगताप यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानमालेचे उद्घाटन अ‍ॅड. प्रताप  परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाऊ आदमणे, शिल्पकार विवेक खटावकर, सुभाष सरपाले, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, मॉडर्न कॉलजचे उपप्राचार्य  मिलींद वाघमारे, प्रा. संगीता मावळे उपस्थित होते.
नक्षलवादी भागात काम करताना तेथील अनेकांच्या हातात बंदुकांच्या जागी पेन आणि डोक्यात अहिंसेचे विचार जागृत केले आहेत. गुन्हेगाराची शिक्षा संपल्यानंतर  त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गावर जातात. शिक्षकांची मुले शिक्षक, डॉक्टरांची मुले डॉक्टर होतात आणि गुन्हेगारांची मुले त्याच  मार्गाकडे वळतात. त्यामुळे गुन्हेगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी दत्तक योजनेची सुरूवात केली. गुन्हेगारांची पुढची पिढी  व्यसनाधीन नाही तर चांगल्या विचारांची घडवायची आहे. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे जगताप यांनी सांगितले.
भारतीय युवक आणि आव्हाने या विषयावर तीन दिवसीय व्याख्यानमालेत दहशतवाद आणि शिवचरित्र या विषयावर पराग ठाकूर, व्यसनाधिनता आणि राष्ट्र उभारणीत  युवकांचा सहभाग या विषयावर डॉ. मिलींद भोई यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

 
Top