Breaking News

डॉ. सुब्बलक्ष्मी यांचा संगीत वारसा उदयोन्मुख वादकांनी पुढे न्यावा : राज्यपाल


मुंबई,दि.17  : भारतरत्न डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या नावाने ज्या तरुण, उदयोन्मुख वादकांना आज शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे त्यांनी डॉ. सुब्बलक्ष्मी यांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले
ज्येष्ठ संगीतकार भारतरत्न डॉ.एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या शतकोत्तर समारंभात राज्यपाल बोलत होते. यावेळी देशभरातून निवडलेल्या 50 तरुण, गुणी वादकांना संगीत क्षेत्रातील भारतरत्न डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी शिष्यवृत्ती राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. यावेळी राज्यपाल म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून या कार्यक्रमाला मी दरवर्षी उपस्थित राहत आहे. उदयोन्मुख वादकांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असून त्यामुळे या कलेचा वारसा जोपासण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे, ते ती योग्यप्रकारे पार पाडतील, असाही विश्‍वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. प्रख्यात संगीतकार डॉ. सुब्बलक्ष्मी यांच्या नावाने आज प्रदान करण्यात आलेली शिष्यवृत्ती ही खासगी संस्थेची सगळ्यात मोठी शिष्यवृत्ती आहे, हे अतिशय कौतुकास्पद आहे, असे सांगून ही शिष्यवृत्ती देणार्‍या संस्थेचे राज्यपालांनी यावेळी अभिनंदन केले. भारताला विविध कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे, मात्र शहरीकरणाच्या वाढत्या वेगात आदिवासी कला आणि लोककला कुठेतरी मागे पडताना दिसतात, त्या लोककलांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच मोबाईल, इंटरनेटमध्ये हरवलेल्या आपल्या मुलांना या कला,संस्कृतीची माहिती देऊन कलेचा समृद्ध वारसा या पिढीपर्यंत पोहचवा असे आवाहन केले. श्री षण्मुखानंद आर्टस् आणि संगीत सभा या संस्थांद्वारे तरुण वादकांना शिष्यवृत्ती देण्यात येते. कर्नाटकी गायन, हिंदुस्थानी गायन,मृदंग, व्हायोलिन, कंजिरा, घटम, बासरी, हरिकथा, नादस्वरम आणि वीणा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कलावंतांना शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षी एक लाख रुपयांचे अनुदान याप्रमाणे तीन वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.