Breaking News

सुरेश शिंगणे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार

बुलडाणा, दि. 07, सप्टेंबर - शैक्षणिक कार्यात बहुमूल्य योगदान देणारे मुळचे किनगाव राजा ता.सिंदखेड राजा येथील रहिवाशी व पंचायत समिती देऊळगाव राजा  अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव चिलमखाँ तालुका देऊळगाव राजा येथे कार्यरत असलेले सुरेश उकंडा शिंगणे यांना भारत सरकारतर्फे 2016  चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर दिल्ली येथील विधान भवनात  आयोजित एका दिव्य सत्कार सोहळ्यात सन्मापूर्वक प्रदान करण्यात आला. 
सुरेश उकंडा शिंगणे यांनी आपल्या अध्ययन पद्धतीत अमुलाग्र बदल घडवून आणून प्रत्यक्षात ग्रामीण भागातील मुलांना समजेल व विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी  विविध उपाययोजना राबवित सिंदखेड राजा तालुक्यातील गारखेड तांडा या बंजारा वस्तीतील शाळेपासून सुरुवात झाली. तेव्हाच विद्यार्थ्यांना पुस्तकी भाषा अवघड  वाटू लागल्याने मुलांची घटती संख्या पाहून शिंगणे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेवून ते स्वत: बंजारा बोली भाषा शिकले आणि मुलांना समजेल त्या भाषेत  अध्यापन करुन पटसंख्येत वाढ केली. त्यांनी सामाजिक क्षेत्रात सर्वधर्म समभाव, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता मोहीम, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे  आयोजन, व्यक्तीमत्व विकास वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले या त्यांच्या कार्याची दखल भारत सरकारने घेवून त्यांना आज सदर पुरस्कार देण्यात आला.  यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, ना.प्रकाश जावडेकर, ना.सत्यपालसिंग, अनिल स्वरुप, हुपेंद्र कुशवाह यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व पुरस्कारप्राप्त आदर्श  शिक्षकांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिनंदन केले आहे. सदर पुरस्कार शिंगणे यांना मिळाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.