Breaking News

आणखी किती हत्या!

दि. 07, सप्टेंबर - पत्रकार, विचारवंत गौरी लंकेश यांची गोळया धाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश या सातत्याने भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह,  कडव्या हिंदूत्ववादी संघटनांवर सातत्याने टीका करत, लिखाण करत होत्या, त्यांच्या तकलादू विचारांचा परखडपणे भांडाभोड करत होत्या. मात्र हेच काहींना रूचले  नाही, त्यांच्याशी युक्तीवाद करण्याची, चर्चा करण्याची धमक त्यांच्या विरोधकांत नव्हती, म्हणूनच त्यांना देखील डॉ. दाभोळकर, डॉ. पानसरे, कुलबुर्गीं यांच्यासारखंच  संपवण्यात आले. 
पुरोगामी चळवळीला संपवण्याचे आणि आपल्या विरोधात बोलणार्‍यांची गत ही हत्या करूणच संपावायच असा विडाच या संघटनांनी उचलला आहे. मात्र एकापाठोपाठ  चार विचारवंताची हत्या होऊन देखील सरकार, प्रशासन यांचा निकोप, निरपेक्ष वृत्तीने चोकशी करण्यास तयार नाही, असेच दिसून येते. डॉ. दाभोळकरांची हत्या  झाल्यानंतर जी नावे, जी संघटना समोर आली होती, त्याविरोधात जर सरकारने पावले उचलली असती, तर कदाचित या तीन हत्या रोखता आल्या असत्या. मात्र  आता सरकारवरच शंका येऊ लागली आहे. सरकारविरोधात लढा पुकारणार्‍या, चळवळ उभे करू पाहणारे विचारवंताच्या हत्या होत असतांना, त्याचा तपास  भरकटला जातो. ही हत्या कडव्या संघटनांवर लिखाण केल्यामुळे, त्यांच्या विरूद्ध एक व्यापक जनचळवळ उभी केल्यामुळे हत्या झाली, या बगल देऊन एक वेगळेच  कारण पुढे करून, या तपासाचा रोख बदलला जात आहे. हे भारतीय लोकशाहीत भयावह असून, भविष्यातील नांदी यातून स्पष्ट दिसत आहे. वास्तविक गौरी शंकर  या देशाच्या साध्य परिस्थितीवर वास्तववादी लेखन केरत होत्या, तसेच भाजपच्या दोन खासदारांवर त्यांनी लेखन करून, त्यांनी कडव्या हिंदूत्ववादी विचारसरणीला  सातत्याने विरोध दर्शविला होता. त्यामुळेच गौरी लंकेशचा पानसरे, कलबुर्गी स्टाईलने खून झाला. संघ परिवारावर, धर्मांध राजकारणावर आपल्या लेखणीद्वारे त्या  सतत हल्ले चढवत होत्या. त्या केवळ पत्रकार नव्हत्या तर दीन दलित कष्टकर्‍यांच्या शोषणाविरोधातील लढ्यातील कार्यकर्त्याही होत्या. त्यामुळे त्यांना माओवादी  म्हणून हिणवण्यात येत असे.
असे असले, तरी त्यांनी आपला लेखनीची धार बोथट केली नाही. आपल्या लेखनीने त्यांनी भल्याभल्यांना गारद केले. त्यांचा सामाना व्युक्तीवादाने करणे त्यांच्या  विरोधकांना शक्य नव्हते. त्यांचे विरोधक अनेक वेळेस कोर्ट-कचेर्‍यामध्ये जात त्यांनी गौरी लंकेश ला पुरते बेजार केले. मात्र त्यांनी आपला विचारांचा लढा  आयुष्याच्या शेवटच्या क्षणांपर्यंत तेवत ठेवला. कर्नाटकातील भाजप खासदार जोशींच्या भ्रष्टाचाराविरोधात गौरी लंकेश यांनी आवाज उठवला होता. लेख लिहिल्यामुळे  कोर्टाने त्यांना दोषी ठरवले व उच्चन्यायालयात दाद मागण्यासाठी जमीनही दिला. सध्या उच्च न्यायालयात प्रकरण आहे. लोक शहाणे झाले तर आपली भीती वाटणार  नाही ही खरी भीती आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गीला मारूनही आपले कोणीच काही बिघडवू शकत नाही. कारण सरकार पाठीशी असल्याचा भास या लोकांना  सातत्याने होत आहे. आणि अनेक वर्षांपासून छाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचे हत्यारे अजूनही सापडले नसल्यामुळे पुन्हा विश्‍वास बळातोय. त्यामुळेच आतापर्यंत  3 खून पचले, चौथाही पचनी पचेल हा दांडगा विश्‍वास या मारेकर्‍यांना आहे. संघाच्या विरोधात बोलणार्‍यांना हिंदुत्वाच्या नावाने लक्ष्य केले जात आहे. ज्ञानपीठ  पुरस्कार विजेते, कवी, लेखक यू. आर. अनंतमुर्तीच्या मृत्युनंतर संघपरिवाराने फटाके फोडून मृत्यू साजरा केला होता कारण ते संघपरिवाराचे टीकाकार होते. काही  ठराविक अंतराने देशभरातील विचारवंत, लेखक, पत्रकारांच्या हत्या होत आहे, आरोपी सापडत नाही, ही देशातील व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. मात्र सरकार  नावाची व्यवस्था याची दखल घ्यायला अद्यापही तयार नाही, हीच खरी लाजीरवाणी गोष्ट आहे. पुरोगामी चळवळीने अजून किती हत्या सहन करायच्या हा प्रश्‍न  आहे?