Breaking News

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न

अहमदनगर, दि. 07, सप्टेंबर - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर, गणपती चालले गावाला चैन पडेना जिवाला... एक दोन तिन चार गणपतीचा जय  जयकार.. या घोषणांचा जयघोष, गुलालाची उधळण करत तर दुसरीकडे ढोलताशांच्या तालावर थिरकणारी पावले, बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेला भक्तांचा  जनसागर.. मंगळवारी दिवसभर असाच माहोल दिसत होता. सकाळपासून मंडळामध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी लगबग सुरू झाली. मंडळामध्ये बाप्पाची महाआरती  करण्यात आली आणि गणरायाला निरोप देण्यासाठी उत्साहपूर्ण व मोठ्या भक्तीभावाने नगरकरांनी आवडत्या बाप्पाला निरोप दिला. मिरवणुकीतील ढोल ताशा, झांज  पथक, लेझिम पथकाने नगरकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
सकाळी साडेनऊ वाजता ग्रादैवत विशाल गणेशाची जिल्हाधिकारी  अभय महाजन यांच्या हस्ते उत्थापन पुजा झाल्यानंतर पारंपारिक वातावरणात शहरातील प्रमुख  मंडळाच्या गणरायांची विसर्जन मिरवणूक निघाली. मुख्य विसर्जन मिरवणूक रामचंद्र खुंट, आडतेबाजार, दाळमंडई, तेलीखुंट, कापडबाजार, अर्बन बँक चौक, नवीपेठ,   चितळेरस्ता, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट दरवाजा मार्गे जाऊन नेप्ती  नाक्यावरील  बाळाजी बुवा विहिरीत  श्रीगणेशमूर्तींचे  विसर्जन करण्यात  आले.  रात्री सव्वा  सात वाजता मुख्य मिरवणूकीतील अग्रस्थानी असलेला मानाचा विशाल गणेशाचा रथ दिल्लीगेट बाहेर पडला. त्यानंतर इतर मंडळांचे गणपती दिल्लीगेट बाहेर पडले.  ग्रामदैवत विशाल गणेशाची जिल्हाधिकारी महाजन यांच्या हस्ते उत्थापन पुजा करण्यात आल्यानंतर मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.  अभय आगरकर व विश्‍वस्त उपस्थित होते. मुख्य मिरवणुकीत मानाचे 12 मंडळांसह  शहर   शिवसेना व इतर  मंडळे   सहभागी  झाले  होते. महापौर सुरेखा कदम,  संभाजी कदम यांनी मानाच्या गणपतीचा रथ ओढला. मिरवणुकीत ढोल ताशा, झांज पथकाच्या निनादात डिजेच्या आवाजात तरूणाईने ठेका धरला होता.
गुलालाची उधळण करत तरूणाईने एकच जोल्लोष केला होता. कपिलेश्‍वर मंडळाच्या आकर्षक रथाने नगरकरांचे लक्ष वेधले होते. मिरवणुक मार्गावर आकर्षक रांगोळी  काढण्यात आली होती. दातरंगे मळा मंडळाच्यावतीने आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते गणेशभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. आदर्श व्यापारी त्रि मंडळ  व एसीसी क्रिकेट क्लबर्ते बंदोबस्तावरील पोलिसांना भोजन व पाण्याची व्यवस्था करण्यात आली.