Breaking News

वाहनाच्या धडकेने चार ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू, तीन जण जखमी

औरंगाबाद, दि. 16, सप्टेंबर - औरंगाबादमध्ये भरधाव वेगाने जाणार्या वाहनाने सकाळी प्रभात फेरीला जात असलेल्या जेष्ठ नागरिकांना धडक दिली असून या  अपघातात चारही ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला, तर आणखी तीन जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास  जालना रोडवरील केंब्रिज शाळेसमोर ही घटना घडली. जालना रोडवर मोकळी हवा असल्याने जेष्ठ मंडळींचे गट या परिसरात फिरावयास जात असतात. त्याप्रमाणे  सहा-सात जणांचा गट फिरावयास गेला होता, त्या वेळी अमरावतीहून भरधाव वेगाने येणार्या स्कार्पिओ गाडीने जेष्ठांना चिरडले. यात भागीनाथ लिंबाजी गवळी,  नारायण गंगायाम वाघमारे, दगडुजी बालाजी ढवळे आणि अनिल विठ्ठल सोनवणे हे चौघे जण जागेवरच मरण पावले, तर अन्य तीन व्यक्ती जखमी असून यातील  दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर ही गाडी बाजूच्या नाल्यात जाऊन पडली. ही गाडी अमरावतीची असून एका राजकीय पक्षाचे चिन्ह गाडीवर आहे.  अपघातानंतर वाहनचालक मात्र घटनास्थळावरून पसार झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेचे वृत्त शहरात वार्यासारखे पसरले असून संतप्त  प्रतिक्रीया येत आहेत.