Breaking News

अमरनाथ हल्ल्यांचा सूत्रधार अबू इस्माईला कंठस्नान

श्रीनगर, दि. 15, सप्टेंबर - अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर ए तोयबाचा प्रमुख दहशतवादी अबू इस्माईलला कंठस्नान घालण्यात आलं  आहे. श्रीनगरजवळ नौगाममध्ये सुरक्षा अधिकार्‍यांशी झालेल्या चकमकीत अबूसह त्याच्या साथीदाराचा खात्मा करण्यात आला.
‘पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अबू इस्माईल आणि त्याच्या साथीदाराला नौगाममध्ये ठार मारण्यात आलं. सुरक्षा दल आणि पोलिसांनी मोठी  कामगिरी बजावली आहे.’ असं जम्मू आणि काश्मिर पोलिस अधिकार्‍यांतर्फे सांगण्यात आलं. अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा अबू इस्माईल सूत्रधार असल्याचंही  पोलिसांनी सांगितलं.
दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा अधिकार्‍यांनी गराडा घातला आणि चकमकीत दोघांचा खात्मा केला. अबू इस्माईलसोबत पाकिस्तानचा रहिवासी  असलेला छोटा कासिम ठार झाला. दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. अमरनाथ यात्रेच्या बसवर झालेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता.  यामध्ये सहा महिलांचा समावेश होता. तर 19 जण जखमी झाले होते.