Breaking News

लोळेगांव बंधार्‍याचे दरवाजे गूल!

अहमदनगर, दि. 14, सप्टेंबर - गेल्या आठ दिवसांपासून सतत पडणार्‍या पावसामुळे तालूका व परिसरातील नद्यांना मोठया प्रमाणावर पाणी आले. सोमवारी दि.  11 रात्री झालेल्या मोठ्या पावसामुळे ढोरा नदीवरील लोळेगांव बंधार्याचे दरवाजे पाण्याबरोबरच वाहून गेले. त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनेच्या संतप्त  कार्यकर्त्यांनी,  पावसाळा उघडल्यानंतर बंधार्‍यांत कसं साठवण करणार, असा सवाल उपस्थित करीत दोषी अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी  केली. 
या प्रकारामुळे जलसंपदा विभागाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. दोन महीन्याच्या खंडानंतर शेवगाव तालूका व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. पूर्ण  दोन महिने शेवगाव तालुक्यात व परिसरात पाऊस नसल्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांच्या चार्‍याचे मोठे संकट उभे राहिले होते. अशातच झालेल्या मोठ्या  पावसामुळे ज्या साखळी बंधार्‍यांनी हे पाणी अडवायला पाहिजे होते, त्या साखळी बंधार्‍यांचे दरवाजेच पाण्याबरोबर वाहून गेले आहेत. आठ दिवस होऊनही संबंधित  विभागाचे याकडे लक्ष नसल्याचे आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. विशेष म्हणजे या गंभीर बाबी नजरेसमोर आणूनही या विभागाचे निगरगट्ट अधिकारी  उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटना मात्र आक्रमक झाल्या आहेत.
मेंटेनन्स कोण देणार?
दरम्यान जामखेड ऑफिसचे जलसंपदाचे अधिकारी औटी यांना याविषयी विचारले असता, ते म्हणाले, आम्ही हा बंधारा सोसायटी करून सरपंच काळे यांच्या ताब्यात  दिला आहे. त्यांना विचारा. त्यानंतर सरपंच भानुदास काळे यांना याविषयी विचारले असता गेली दोन वर्षे हे दरवाजे पाण्याबरोबर वाहत आहेत. पाणी साठवण होत  नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोणतेही पाणी बंधार्‍यात अडवले जात नाही. ज्यावेळी बंधारा हस्तांतरित केला त्यावेळी त्याचा हायड्रोलिक चार्ज व  इतर गोष्टी शासनाने दिल्या नाहीत तसेच त्यांचा मेंटनस दुरुस्ती व देखभाल खर्च कोणी द्यायचा, असा प्रतिसवाल त्यांनी केला.