Breaking News

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरीच्या घटनांत वाढ

पुणे, दि. 07, सप्टेंबर - विसर्जन मिरवणूकीत अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: लक्ष्मी रोड आणी अलका चौकात या  घटना घडल्या. गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या मौल्यवान वस्तू चोरणार्‍या टोळ्या मागील काही वर्षात शहरात सक्रीय झाल्या आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती  मंदिर आणी मंडई परिसरातही गर्दी लक्षात घेऊन दर्शनाला आलेल्या भाविकांच्या सोनसाखळ्या, मंगळसूत्र, मोबाईल आणी मंगळसूत्र चोरीच्या अनेक तक्रारी मागील  दहा दिवसांत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. मागीलवर्षीही सुमारे 50 मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या . मात्र ईएमआय नंबर अभावी  अनेकदा पोलीस तक्रार घेण्यात नकार देतात. यामुळे अनेक नागरिक तक्रार नोंदवत नाहीत. यावेळीही मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र नागरिक लगेचच  तक्रार देण्यास येत नसल्याने पुढील एक दोन दिवसांत मोबाईल व इतर मौल्यावान ऐवज चोरीला गेल्याचा नक्की आकडा कळेल असे पोलीसांनी सांगितले.
फिर्यादी वैभव सोनवणे (36,रा.कर्वेनगर) हे विसर्जन मिरवणुक पहाण्यासाठी कुलकर्णी पेट्रोलपंपाजवळ थांबले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन  फिर्यादी यांच्या गळ्यातील 1 लाख 35 हजार रुपयांची सोन्याची चेन चोरुन नेली. तर दुसर्‍या एका घटनेत फिर्यादी मोहित महाडवाले(रा.पिंपरी)हे मुळचंद साडी सेंटर  दुकानाच्या पदपथावर मिरवणूक पहात बसले होते. यावेळी त्यांच्या खिशात हात घालून त्यांचा पंधरा हजार रुपयांचा मोबाईल चोरण्यात आला. हा मोबाईल चोरताना  विशाल रघुनाथ चव्हाण(रा.लातुर) याला रंगेहाथ पकडण्यात आले.
धनकवडीमध्ये किरकोळ कारणावरुन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. घटना घडली तेव्हा काही अल्पवयीन  मुलेही त्यामध्ये सहभागी झाली होती. एकमेकांच्या मागे बांबू घेऊन हे कार्यकर्ते धावत होते. मात्र घटनास्थळी तसेच घटनास्थळापासून काही अंतरावरही पोलीसांचा  मागसूगही नव्हता.  विसर्जन मिरवणूकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीच्या अनेक घटना घडल्या. टिळक रोड, कुमठेकर रोड तसेच केळकर रस्त्यावर या घटना  घडल्या. नाचताना धक्का-बुक्की तसेच नशेत भांडणे करण्याचे प्रकार घडले. पोलीसांनी काही ठिकाणी हस्तक्षेप करत प्रकरण जागेवरच मिटवली. तर काही कार्यकर्ते  पोलीसांना जुमानत नव्हते. बालगंधर्व चौकातही एका मंडळाने पदपथावरच विसर्जन रथ थांबवल्याचा प्रकार घडला होता.