Breaking News

एस.टी. कामगार 16 ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर

सांगली, दि. 08, ऑक्टोबर - राज्यातील एस.टी. कामगारांना पदनिहाय वेतनश्रेणी व सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह अन्य विविध मागण्यांसाठी दि. 16  ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार संघटनेचे नेते बिराज साळुंखे यांनी दिली.
एस.टी. कामगारांना पदनिहाय वेतनश्रेणी दिली जात नाही. याशिवाय इतर कामगार वर्गाप्रमाणे सातवा वेतन आयोगही दिला जात नाही. 1 एप्रिल 2016 पासून हंगामी  वेतन वाढ द्यावी, राज्य शासनाने दि. 1 जुलै 2016 रोजी कामगारांना वाढीव महागाई भत्ता व इतर काही सवलती देण्याच्या घोषणा केल्या होत्या. त्याची अद्यापही  अंमलबजावणी झाली नाही. मात्र एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत राज्य शासन उदासिन आहे. राज्य शासनाकडून या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात  आहे. एसटी कामगारांच्या मागण्या व न्याय हक्कासाठी वारंवार विनंती करूनही अन्याय केला जात आहे. याविरोधात आता निर्णायकी लढा उभारण्याचा निर्धार एसटी  कामगारांनी केला असून या लढ्याचा एक भाग म्हणून दि. 16 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून राज्यातील सर्व एसटी कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत. या  बेमुदत संपात एसटी कामगारांच्या सर्वच संघटना सहभागी होणार असल्याचेही बिराज साळुंखे यांनी सांगितले.