0
ढाका, दि. 08, ऑक्टोबर - क्रिकेट सामन्यात अंपायरिंग करत असताना छातीत चेंडू लागल्यानं बांगलादेशमध्ये एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षाच्या रफियुल इस्लामचा  (शुक्रवार) ढाकामधील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बलूर मठ मैदानावर अंपायरिंग करत असताना फलंदाजानं टोलावलेल्या चेंडूचा जोरदार आघात रफियुलच्या छातीवर झाला आणि तो थेट खालीच कोसळला.  त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्थानिक पोलीस अधिकारी इनामुल हक यांनी दिलेल्या  माहितीनुसार, ‘मुलं मैदानावर क्रिकेट खेळत होतो आणि रफियुल अंपायरिंग करत होता. पण एक चेंडू त्याच्या छातीवर लागला आणि तो खालीच कोसळला.’ पुढं  त्यांनी अशीही माहिती दिली की, ‘तो फारच गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्याचे वडील हे रिक्षाचालक आहेत. तर त्याची आई घरकाम करते.’ दरम्यान, तीन  वर्षापूर्वी एक उसळता चेंडू डोक्याला लागून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूज याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Post a Comment

 
Top