Breaking News

सांगली जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायती बिनविरोध

सांगली, दि. 07, ऑक्टोबर - सांगली जिल्ह्यातील 453 ग्रामपंचायतीपैकी 27 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी एक हजार 238, तर सदस्य पदासाठी पचा हजार 453 जणांनी माघार घेतली. अनेक ग्रामपंचायतीत बहुरंगी- तिरंगी लढती होत आहेत.
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीत पलूस तालुक्यातील पुणदी, शिराळा- कोकरूड, चिंचोली, शेडगेवाडी, माळेवाडी, शिंदेवाडी, वाकुर्डे खुर्द, चिखली, गवळेवाडी, गिरजवडे व खुंदलापूर, कवठेमहांकाळ- केरेवाडी व लांडगेवाडी, वाळवा- मरळनाथपूर, जुनेखेड, भरतवाडी, कोळे, जांभुळवाडी व ङ्गार्णेवाडी (बी), आटपाडी- यमाजीपाटलाचीवाडी, बाळेवाडी, पडळकरवाडी, पारेकरवाडी व कामथ, जत- रावळगुंडवाडी व मोकाशेवाडी, तर कडेगाव तालुक्यातील रेणुशेवाडी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
मिरज तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 110 जण, तर 38 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी 642 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. रसूलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांची व 23 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. पद्माळे व सांबरवाडी गावात सरपंचपद रिक्त राहिले आहे. पलूस तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी 38, तर सदस्यपदासाठी 415 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणदी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून पलूस तालुक्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम, भारतीय जनता पक्षाचे सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरूण लाड यांच्या गटात पुन्हा काट्याची लढत पहायला मिळत आहे.
शिराळा तालुक्यातील 50 सरंपचपदासाठी 152, तर सदस्यपदासाठी 889 जण निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यातील दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित ग्रामपंचायतींसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, भाजपचे नेते आमदार शिवाजीराव नाईक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गटात जोरदार लढत होत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. या तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 75, तर 247 सदस्यपदासाठी 567 जण निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात काही ठिकाणी दुरंगी अथवा तिरंगी चुरशीच्या लढती होत आहेत.
वाळवा तालुक्यातील 88 पैकी सहा ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सरपंचपदासाठी 240, तर सदस्यपदासाठी एक हजार 997 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या तालुक्यात चिकुर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाची निवड बिनविरोध होऊन शिवसेनासमर्थक उमेदवाराने प्रथमच भगवा ङ्गडकवला आहे. तासगाव तालुक्यात सरपंचदासाठी 62, तर सदस्यपदासाठी 536 उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या या तालुक्यात भाजपचे नेते खासदार संजय पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आमदार श्रीमती सुमन पाटील यांच्या गटातच काट्याची लढत होत आहे.
आटपाडी तालुक्यातील 26 पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 21 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 55, तर सदस्यपदासाठी 460 जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. खानापूर तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 122, तर सदस्यपदासाठी 766 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या तालुक्यातील पळशी गावाने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे. जत तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींसाठी तिरंगी लढत होत आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 271, तर सदस्यपदासाठी एक हजार 790 उमेदवार आहेत. या तालुक्यातील उमदी ग्रामस्थांनीही ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे, तर दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या तालुक्यात भाजपचे नेते आमदार विलासराव जगताप, काँग्रेसचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विक्रम सावंत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे अशी तिरंगी लढत होत आहे.