Breaking News

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी फळविमा योजना; अंतिम मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत

नागपूर, दि. 06, ऑक्टोबर - राज्य शासनातर्फे 2016-17 आर्थिक वर्षासाठी पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना जाहीर करण्यात आली  आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील संत्री, मोसंबी, केळी, लिंबू या फळपिक आंबिया बहाराकरिता योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी  सहसंचालक अधिकार्‍यांनी दिली.
यासंदर्भात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फळपीक विमा योजना कर्जदार शेतकर्‍यांना सक्तीची असून, बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. ही योजना दोन  समूहामध्ये राबविण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात संत्रा आणि मोसंबी या फळपिकांकरिता एचडीएफसी-अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी विमा देणार आहे. तर वर्धा  जिल्ह्यात कंपनीमार्फत संत्रा, मोसंबी, केळी, लिंबु फळपिकांकरिता इफको टेकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड या विमा योजना राबविण्यात येणार आहे.  शेतकर्‍यांना विमा हप्ता दर संरक्षित रक्कमेच्या पाच टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम शेतकर्‍यांनी भरावयाची आहे. उर्वरीत विमा हप्ता केंद्र व  राज्य शासन सम प्रमाणात विमा हप्ता स्वरूपात अदा करणार आहे.
फळपीक विमा योजना नागपूर व वर्धा जिल्ह्यातील मंडळामध्ये राबविण्यात येणार आहे. मोसंबी पिकाकरिता नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, नरखेड, सावनेर व  कळमेश्‍वर तालुक्याची निवड करण्यात आली आहे. संत्रा पिकांकरिता नागपूर, कामठी, हिंगणा, रामटेक, पारशिवनी, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्‍वर, उमरेड,  भिवापूर व कुही तालुक्याचा समावेश आहे.
मोसंबी पिकाकरिता वर्धा जिह्यातील कारंजा व आष्टी तालुका, संत्रा पिकांकरिता आर्वी, कारंजा, व आष्टी तालुक्यातील शेतकर्‍यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणार  आहे. तर, लिंबु पिकाकरिता आर्वी, आष्टी व कारंजा तर, केळी पिकांकरिता सेलू तालुक्यातील झडशी गावाची निवड करण्यात आली आहे.
आंबिया बहरात मोसंबी व केळी या पिकांसाठी शेतकर्‍यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करावयाचे आहे. तसेच संत्रा फळपिकाकरिता 30 नाव्हेंबर  आणि लिंबु फळाकरिता 14 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव बँकांना सादर करावयाचे आहेत. अधिक माहितीकरिता क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी  अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधता येईल.