Breaking News

येत्या 48 तासात मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे, दि. 08, ऑक्टोबर - राज्यातून मान्सून परतीच्या तयारीत असला तरी कोकण, मध्य महाराष्ट्रात मात्र, पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे चित्र दिसत आहे.  शुक्रवारपासून कोकण, मुंबई व मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच येत्या 48 तासात मुंबईसह राज्यभरात मुसळधार  पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
मान्सून पावसाने उत्तर भारतातून परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर राज्यातूनही त्याने माघारी फिरण्याची तयारी केली आहे. मात्र, परतीच्या प्रवासाआधी राज्यातील  काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी अनेक ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी स्वरुपाचा पाऊस पडला. तर विदर्भ, मराठवाड्यात  तुरळक ठिकाणी सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. दरम्यान, येत्या 48 तासांत कोकणासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार पाऊस पडेल, असा  अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दक्षिण ओडिशा येथे सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटक ते केरळ किनारपट्टी दरम्यान द्रोणीय क्षेत्र कार्यरत आहे. या दोन्ही  स्थितींमुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. पुढील 2 ते 3 दिवस राज्यभरात  कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडतच राहील, असेही हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. गेल्या 24 तासांत रोहा 110 मि.मी, चिपळूण 50 मि.मी, सांगली  20 मि.मी, दापोली 10 मि.मी, सातारा 50 मि.मी, महाबळेश्‍वर 40 मि.मी, कोल्हापूर 10 मि.मी, लोणावळा 20 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.