Breaking News

सराईत गुन्हेगाराकडून 687 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

पुणे, दि. 13, ऑक्टोबर - वाकड कस्पटेवस्ती येथील कल्पतरू सोसायटीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात वाकड पोलिसांना यश आले असून सराईत  गुन्हेगाराकडून 687 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यातून वाकड पोलीस ठाण्यातील एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.प्रभाकर पांडुरंग सुतार (वय 42, रा.  भोसले बिल्डिंग, महालक्ष्मी कॉलनी दिघी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रभाकर सुतार मागील दोन वर्षांपासून कल्पतरू हार्मोनी सोसायटी व कल्पतरू स्प्लेंडर सोसायटी येथे सुतार काम करीत होता. दरम्यान  त्याने सोसायटी मधील बंद असलेल्या फ्लॅटवर पाळत ठेऊन बनावट चावीने फ्लॅटचे दार उघडून तसेच उघड्या फ्लॅटमध्ये जाऊन सोन्याचे दागिने चोरले. याबाबत सहाय्यक पोलीस  निरीक्षक दत्तसाहेब लोंढे व कर्मचा-यांनी कल्पतरू हार्मोनी सोसायटी येथे काम करणा-या घरगडी, मोलकरीण, सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन यांच्याकडे विचारपूस व चौकशी केली  असता, पोलिसांना बातमीदारांमार्फत या सोसायटीत सुतारकाम करणा-या प्रभाकर पांडुरंग सुतार याने चोरी केली असल्याचे उघडकीस आले.कस्पटेवस्ती वाकड येथील कल्पतरू  सोसायटीत झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी प्रभाकर पांडुरंग सुतार यास अटक करून शिवाजीनगर न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर  पोलीस तपासात आरोपीने तब्बल 20 लाख, 61 हजार, 450 रुपयांचे एकूण 687 ग्रॅम सोने चोरले असल्याचे मान्य केले.