Breaking News

नगर जिल्ह्यात मागील 7 वर्षातील सर्वाधिक पाऊस यंदाच्या वर्षी

अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर - सातत्याने दुष्काळी जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या नगर जिल्ह्याची ही ओळख आता पुसली जाऊ लागली  आहे.मागील 7 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत झाली आहे.यंदाच्या पावसाळ्यात नगर जिल्ह्यात सरासरीच्या तब्बल 138 टक्के  पाऊस झाला आहे.
मागील 7 वर्षांचा विचार केला तर 2011 मध्ये 98 टक्के,2012 मध्ये 77 टक्के,2013 मध्ये 119 टक्के,2014 मध्ये 77 टक्के,2015 मध्ये 79 टक्के,2016 मध्ये  136 टक्के व आता 2017 मध्ये आतापर्यंत चक्क 138 टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.पावसाची सरासरी जून ते ऑक्टोबर या कालावधीत मोजली  जाते.यंदाच्या वर्षी ची पावसाची ही आकडेवारी सप्टेंबर महिन्यापर्यंतच आहे.त्यामुळे परतीचा पाऊस झाला तर आकडेवारीमध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता  आहे.साधारणपणे नगर जिल्ह्यात सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला तर उन्हाळ्याच्या कालावधीत नगर जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊन मोठ्या  प्रमाणावर टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो.मागील 7 वर्षांचा विचार केला तर तब्बल 4 वेळा 100 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस नगर जिल्ह्यात झाला आहे.त्यामध्ये ही  2011 मध्ये 98 टक्के व 2012 मध्ये फक्त 77 टक्के इतका कमी पाऊस झाला होता.सलगपणे 2 वर्षे कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई  व चारा टंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर पाण्याचे टँकर व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या होत्या.
नगर जिल्ह्यातील कमी पावसाचा परिणाम थेट मराठवाड्यावर देखील होत असतो.नगर जिल्ह्यातील भंडारदरा,निळवंडे व मुळा या धरणांमधून सोडलेले पाणी  जायकवाडी धरणात जमा होते.मात्र जिल्ह्यातील धरणांमध्येच पाणी साठा कमी असला तर जायकवाडीसाठी पाणी सोडणे कठीण असते.अशा स्थितीत नगर,नाशिक व  मराठवाडा असा प्रादेशिक वाद देखील निर्माण होतांना दिसतो.गेली 2 वर्षे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीवरून न्यायालयात याचिका दाखल झाल्याचे  देखील पहावास मिळाले होते.यंदा मात्र नगर जिदल्ह्यातील धरणांबरोबर जायकवाडीचे धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाण्याच्या प्रश्‍नावरून निर्माण होणारा  प्रादेशिक वाद देखील यंदा मिटला आहे.नगर जिल्ह्यात तर आताच 138 टक्के पाऊस झालेला असल्याने नद्या,नाले,ओढे पूर्णक्षमतेने भरून वाहात असून प्रमुख  धरणांसहीत बहुतांश ठिकाणचे पाझर तलावदेखील ओव्हरफ्लो झाले आहेत.या पाश्वभूमीवर 2018 च्या फन्हाळ्यात नगर जिल्ह्यात पाण्याची टंचाई जाणवणार  नसल्याने प्रशासनाला देखील मोठा दिलासा मिळाला आहे.