Breaking News

बोदवड, सावदा, निंभोरा उड्डाणपुलांसाठी 90 कोटी - रक्षाताई खडसे

जळगाव, १० ऑक्टोबर - जळगाव जिल्ह्यातील बोदवड, सावदा, निंभोरा येथे रेल्वे उड्डाणपुलांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खा. रक्षाताई खडसे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
रस्त्यावरील वाहतूक वाढल्यामुळे बोदवड, सावदा, निंभोरा रेल्वे उड्डाणपुलाची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. यासाठी खासदार खडसे यांच्यासह माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे बोदवड, सावदा, निंभोरा या तीन ठिकाणी रेल्वे पुलांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.
या निधीत राज्य शासनाचाही हिस्सा आहे. रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केले जाणार असून, भूसंपादनासाठी मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी तसे संमतिपत्र दिले आहे. येत्या दोन महिन्यांत या पुलांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
भुसावळ व दुसखेडा येथे उपरस्ते
भुसावळ येथील आराधना कॉलनी येथे उपरस्ता तयार करण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दुसखेडा येथेही उपरस्त्याचे काम सुरू झाले आहे.