Breaking News

कारागिरांना मुद्रा योजनेचा लाभ द्या - हंसराज अहीर

नागपूर, दि. 08, ऑक्टोबर - युवकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून व छोट्या उद्योगांच्या विस्तारासाठी मुद्रा योजनेचा माध्यमातून कर्ज पुरवठा उपलब्ध व्हावा  यासाठी मुद्रा योजनेतील संकलपना प्रभावीपणे राबविण्यात येत असून बँकांनीही मुद्रा योजनेच्या माध्यमातून युवा उद्योजक व कारागिरांना सूलभपणे कर्ज उपलब्ध  करुन द्यावे, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. नागपुरात मुद्रा प्रोत्साहन अभियानाचा शुभारंभ केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर  यांच्याहस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
राज्यस्तरीय बँक समिती महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यामाने तसेच निती आयोगाच्या मार्गदर्शनानुसार प्रोत्साहन अभियानाचे आयोजन करण्यात  आले होते. याप्रसंगी अहीर म्हणाले की, जनधन योजनेसोबतच बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा  योजनेसारखी महत्वकांक्षी योजना संपूर्ण देशात प्रभावीपणे राबविली असून या योजनेमध्ये सर्व बँकांनी सक्रिय सहभाग देण्याची आवश्यकता आहे. जनधन योजनेमध्ये  30 कोटी नवीन बँक खाते उघडण्यात आले असून या योजनेचा लाभ या माध्यमातून मिळणे सूलभ झाले आहे. मेकींग इंडीया व स्कील इंडियाच्या माध्यमातून  स्वत:चा उद्योग सुरु करावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
शेतीसोबत दूधउत्पादनासह पूरक उद्योग सुरु करण्यासाठी शेतकर्‍यांनी पुढे येवून मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेवून आर्थिक विकास साधल्यास शेतकर्‍यांमध्ये  नैराश्य येणार नाही. ग्रामीण भागातील लहान उद्योगासोबतच कारागिरांनीही मुद्रा योजनेच्या माध्यमातून विविध वस्तूंचे उत्पादन केल्यास बाजारपेठेत वस्तुंची आयात  करावी लागणार नाही. सर्व बँकांच्या झोनल अधिकार्‍यांनी मुद्रा योजनेला प्राधान्य द्यावे व शासनाच्या या महत्वकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे  आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.