Breaking News

ठाण्यात इको सिटी अंतर्गत सुरू होणार ग्रीन बिल्डींग प्रकल्प

ठाणे, दि, 12, ऑक्टोबर - विविध पर्यावरणाभिमुख प्रकल्प राबवून ठाणे शहराला वेगळी ओळख प्राप्त करून देणा-या ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आता इको सिटी अंतर्गत जागतिक  वित्तीय संस्थेच्या सहकार्याने ग्रीन बिल्डींग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. आज यासंदर्भात जागतिक वित्तीय संस्थेच्या अधिका-यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेवून  याबाबतचे सादरीकरण केले.
आज दुपारी महापालिका आयुक्त यांच्या समवेत झालेल्या या बैठकीत अस्तीत्वातील इमारती तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारती, गृहसंकुले या ठिकाणी उर्जा कार्यक्षमता,  अपारंपारिक उर्जेचा वापर, पिण्याच्या पाण्याचे कार्यक्षम नियोजन, सांडपाण्याचा पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणाभिमुख बांधकाम साहित्य इत्यादी बाबींचा विचार करून ग्रीन बिल्डींग  मानांकन तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
दरम्यान ग्रीन प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक ते धोरणात्मक बदल करणे, सर्व बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद यांचा यामध्ये सहभाग निश्‍चित करणे, महापालिका क्षेत्रात पर्यावरणा भिमुख इमारती बांधणेबाबत प्रोत्साहनपर उपाययोजना आखणे आदीबाबत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या बैठकीच महत्वपूर्ण चर्चा केली.
सदर प्रकल्पामुळे शहरामध्ये पाण्याचा वापर, घनकच-याचे योग्य व्यवस्थापन, तसेच वीजेचा वापर कमी होण्यास मदत होणार आहे.