Breaking News

मुद्रा प्रोत्साहन मेळाव्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि, 12, ऑक्टोबर - कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन व चालना मिळण्याच्या दृष्टीने जनजागृती व्हावी, यासाठी आज मुंबई विद्यापीठात मुद्रा प्रोत्साहन मेळाव्याचे आयोजन करण्यात  आले होते. या मेळाव्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कॅशलेस व्यवहारांनी पारदर्शकता येते व ही काळाची गरज असल्याचे मत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी  उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.
कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन व जनजागृतीसाठी मुंबई विद्यापीठात डिजिटल प्रदान मोहिमेअंतर्गत मुद्रा प्रोत्साहन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उदघाटन  सोहळा मुंबई विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात पार पडला.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. सिंग म्हणाले, मुद्रा लोन हे महिलांसह शेतकरी वर्गाला शेतीपुरक व्यवसायांसाठी लाभदायक ठरणारे आहे. यातून रोजगाराच नवे दार खुले होणार आहे. याबाबत  यासारख्या मेळाव्यांमधून मार्गदर्शन होत आहे.
महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, समाजामध्ये जगण्याचा आत्मविश्‍वास मुद्रा लोन द्वारे लोकांमध्ये येईल, महिला कर्जाची परतफेड करण्यामध्ये अग्रेसर असतात. कर्ज  घेतल्यानंतर कर्जाची परतफेड वेळेवर केल्यास, पुढील दहा व्यक्तिंना कर्ज मिळण्यास सोईचे जाते.
या मेळाव्यात 30 स्टॉल्सद्वारे कॅशलेस व्यवहारांविषयी सुविधा दर्शविणारे तसेच आपला स्वतःचा उद्योग सुरु करणार्‍या साठी कर्ज पुरवणारे साहित्य बँकांनी ठेवले होते. भारतीय स्टेट बँक,  आयसीआयसीआय, महाराष्ट्र बँक, क्सिस बँक , कार्पोरेशन, येस बँक, एच डी एफ सी बँक आदींसह काही सहकारी बँकांनीही येथे ग्राहकांना माहिती दिली. आधार नोंदणी संदर्भात आ ॅनलाईन माहिती देण्यात येत होती. शासकीय स्टॉल्समध्ये आरटीओ,मुद्रांक नोंदणी विभागांचे स्टॉल्स होते. या स्टॉलच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहारांसह डिजिटल व्यवहारांविषयी ग्राहकांना  मार्गदर्शन करण्यात आले. या प्रकारच्या मेळाव्यांमुळे कॅशलेस व डिजिटल व्यवहारांना चालना मिळेल असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.