Breaking News

माजी आ. राजीव राजळे यांचे ह्दयविकारच्या झटक्याने निधन

 अहमदनगर, दि. 08, ऑक्टोबर - पाथर्डी मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार राजीव राजळे यांचं मुंबईत उपचारादरम्यान निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. गेल्या  दीड महिन्यांपासून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. राजळे हे 2004 ते 2009 या कालावधीत काँग्रेसचे आमदार होते. राजळे यांनी  आर्किटेक्ट पदवी घेतली होती. उत्तम संघटक आणि कुशल व्यवस्थापक म्हणून त्यांची ख्याती होती. विधानसभेत उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होत.  राजळे हे अहमदनगर जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक होते. तर भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचे पती होते. माजी आमदार आणि वृद्धेश्‍वर सहकारी  साखर कारखान्याचे चेअरमन आप्पासाहेब राजळे यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे ते मावस भाऊ होते. राजळे यांनी 2014 साली राष्ट्रवादीकडून  लोकसभा निवडणूकही लढवली होती. राजळे यांचं व्यक्तीमत्व अष्टपैलू होतं. टेक्नोसॅव्ही म्हणूनही त्यांची ओळख होती. राजळेंचा जनसंपर्क दांडगा होता. पाथर्डी  तालुक्यातील सत्ताकेंद्रांवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व होतं. राजळेंच्या अकाली मृत्यूने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. राजळे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलं, आई,  वडील आणि भाऊ आहे. राजळे यांच्यावर पाथर्डीत पिंपळगाव कासारला आज म्हणजे रविवारी दुपारी 4.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.