Breaking News

अँबी व्हॅलीचा कारभार बंद, कामगारांची केली कपात

पुणे, दि. 04, ऑक्टोबर - मुळशी तालुक्यातील अँबी व्हॅलीचा कारभार आजपासून बंद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने अँबी व्हॅलीची विक्री करण्यासाठी  प्रशासक नेमण्याचे आदेश दिले. त्यानंतर संचालक मंडळाला अँबी व्हॅलीचा कारभार सांभाळणे अडचणीचे झाले होते. त्यामुळे या संचालक मंडळाने कर्मचारी कपात  करत अँबी व्हॅलीचा संपूर्ण कारभार बंद केला.
सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रोतो रॉय यांच्या अँबी व्हॅलीचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर तेथे एका प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.  यामुळे अँबी व्हॅलीच्या उत्पन्नातून येणारा नफा प्रशासकाकडे जमा करावा लागत होता. त्यामुळे अँबी व्हॅलीतील कर्मचार्‍यांना 3 महिन्यांपासून पगार देणे अशक्य  झाल्याने व्हॅलीच्या संचालक मंडळाने अँबी व्हॅलीत काम करणार्‍या 2 हजार 500 कर्मचार्‍यांपैकी 1600 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला. उरलेले  कर्मचारी अँबी व्हॅलीमुळे बाधीत झालेल्या गावांमधील आहेत आणि त्यांना पुढील 15 दिवसांचा पगार देण्यात येणार आहे. त्यानंतर 19 ऑक्टोबरला अँबी व्हॅली  पूर्णपणे बंद करण्यात येईल.
ज्या लोकांच्या अँबी व्हलीमध्ये खासगी मालमत्ता आहेत. अशा लोकांना अँबी व्हॅलीमध्ये येण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच अँबी व्हॅलीमध्ये असलेले  इंटरनॅशनल स्कुल देखील सुरू ठेवण्यात येणार आहे.
सहारा समूहाचे प्रमुख सुब्रोतो रॉय हे त्यांच्या जामिनासाठी आवश्यक असलेले पाच हजार कोटी रुपये भरू शकले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सहारा  समूहाच्या आठ हजार एकरहून अधिक जागेत पसरलेल्या अँबी व्हॅलीचा लिलाव करण्याचा निर्णय एप्रिल महिन्यात घेतला आणि मुंबई उच्च न्यायालयाला त्यासाठी  प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रशासकाने काम सुरु केले. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात अँबी व्हॅलीच्या कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात  आला. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून अँबी व्हॅलीमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.