0
औरंगाबाद, दि. 07, ऑक्टोबर - अंगणवाडी कर्मचार्यांच्या बेमुदत संपाकडे दुर्लक्ष करून संपात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ, तसेच काही मुख्य सेविका अंगणवाड्या सुरू करण्यासाठी शिवीगाळ करून अपशब्द वापरून धमकावत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी आयटकप्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी जेलभरो सत्याग्रह केला. पैठणगेट येथून मोर्चा काढण्यास पोलिसांनी विरोध केल्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. पण, परवानगी मिळाल्यानंतर पैठणगेट ते जिल्हा परिषद मोर्चा काढण्यात आला. यावेळी सत्याग्रह सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड व उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सत्याग्रहासाठी 50 ते 75 महिलांच्या 40 तुकड्या करून प्रमुख नेण्यात आले होते. दुपारी दीड वाजता शालिनी पगारे यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या तुकडीने अटक करवून घेतली. शेवटच्या 40व्या तुकडीतील सत्याग्रहींना सायंकाळी पाच वाजता अटक झाली. या आंदोलनामुळे जिल्हा परिषद परिसरात दिवसभर पोलिसांच्या मोटारींची वर्दळ होती. अटक करून सत्याग्रहींना पोलिस मुख्यालयातील परेड मैदानावर ठेवले होते, त्यांची सायंकाळी सहा वाजता सुटका करण्यात आली. मोर्चामध्ये अडीच हजार कर्मचारी सामील झाले होते. संपाच्या 25व्या दिवशी एकजूट दाखवून देण्यात आली. 25 दिवसांतील हा पाचवा मोर्चा असतानाही सदस्यांची प्रचंड प्रतिसाद दिला. अंगणवाडी कर्मचार्यांचा 11 सप्टेंबरपासून बेमुदत संप सुरू आहे. आंदोलनाचे नेतृत्व प्रा. कॉ. राम बाहेती यांनी केले. यावेळी कॉ. अनिल जावळे, विलास शेंगुळे, तारा बनसोडे, शालिनी पगारे, माया भिवसाने, शिला साठे, मुरली म्हस्के, चंचल खंडागळे, संगीता वैद्य, ललिता दीक्षित, सुनीता शेजवळ यांच्यासह शेकडो महिलांची उपस्थिती होती.

Post a Comment

 
Top