Breaking News

यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून पाच ठार ; तीन गंभीर जखमी

नागपूर, दि. 06, ऑक्टोबर - किटनाशकांच्या फवारणीत झालेल्या मृत्यूमुळे त्राही भगवान झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात आज, गुरुवारी विजेच्या तांडवात पाच  जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राळेगाव तालुक्यातील वरणा, कळंब तालुक्यांतील आमला आणि दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे  झालेल्या विविध घटनांमध्ये आई आणि मुलीसह शेतमजूर व शेतकरी ठार झाले. 
चंदा शंकर रामगडे , तेजस्वीनी शंकर रामगडे , मधुकर पुरुषोत्तम ठोंबरे (सर्व रा. आमला ता. कळंब) हेमंत श्रीकृष्ण थरकडे ( रा. पाभळ ता. दारव्हा) आणि मंजुळा  चंद्रभान राऊत ( रा. निमगव्हाण ता. कळंब) अशी मृतकांची नावे आहे. तर सुमित्रा माणिकराव अंबाडारे , विजय माणिक अंबाडारे, दिनू चंद्रभान राऊत हे तिघे जण  जखमी झालेत.
यासंदर्भातील माहितीनुसार कळंब तालुक्यातील आमला येथील चंदा आणि तेजस्वीनी या मायलेकी शेतात कामासाठी गेल्या होत्या. दुपारी 3 वाजताच्या सुमारास  अचानक वीज कोसळली. त्यात दोघेही जागीच ठार झाल्या. तर मधुकर ठोंबरे हे शेतात काम करीत असताना वीज कोसळून मृत्युमुखी पडले तसेच निंबगव्हाण, वरणा  शिवारात दुपारी 2 वाजता कापूस वेचण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक विजेचा कडकडाट होऊन मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात मंजुळा राऊत  जागीच ठार झाल्या. तर इतर तिघे जण जखमी झाले. अचानक वीज कोसळल्याने सर्वच जण बेशुद्ध पडले होते. परिसरातील लोकांच्या मदतीने जखमींना तत्काळ  राळेगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून यवतमाळला हलविण्यात आले. तिसरी घटना दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे घडली. हेमंत थरकडे  आपल्या शेतात कापूस वेचणीवर लक्ष ठेवण्यासाठी गेले असता दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास अचानक अंगावर वीज कोसळली. त्यात ते गंभीर जखमी झाले.  त्यांना आर्णी येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.