Breaking News

एसटी महामंडळाच्या तिकिटांच्या अक्षरात हेराफेरी

औरंगाबाद, १० ऑक्टोबर - एसटी महामंडळाच्या तिकिटांच्या अक्षरात काहीजण हेराफेरी करून परदेशांची नावे टाकत आहेत. यामुळे इतर प्रवाशांची दिशाभूल होत असून हेराफेरी केलेली अशा प्रकारची तिकिटं सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत.काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमाने याच एसटी महामंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात ‘अंबड ते बांगलादेश’ असे तिकीट व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होते.
एसटीच्या तिकिटावर प्रवासाचे टप्पे, तिकिटाची रक्‍कम, बसचा प्रकार, क्रमांक अशी इत्थ्यंभूत माहिती असते; मात्र अंबड ते बांगलादेश अशा प्रवासाचे तिकीट पाहून नागरिकांनी एसटीची खिल्‍ली उडविली. त्यापाठोपाठ ‘मालेगाव ते अमेरिका’ असे 96 रुपयांचे पंधरा टप्पे दर्शविणारे तिकीट व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आहे. वास्तविक ही दोन्ही तिकिटे खोडसाळपणाने तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. अंबड ते बंगला (शिऊर) असे नमूद असलेल्या तिकिटावरील ‘बंगला’ शब्दांमध्ये कुणीतरी खोडसाळपणे बदल करून तो ‘बांगलादेश’ असा करण्यात आला.
तिकिटावरील सर्व माहिती कायम ठेवून त्या ठिकाणी केवळ ‘बांगलादेश’ असे प्रिंट करण्यात आले. त्याचप्रमाणे मालेगाव ते अमेरिका या तिकिटावरही अशाच पद्धतीने बदल करून व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्यात आले. सर्वसामान्य व्यक्तीला मात्र याबद्दल फारशी माहिती नसल्याने
त्यांचा एसटीने विदेशाचे तिकीट देऊन आपल्या नाकर्तेपणाचे दर्शन घडविले असा समज होत आहे. या तिकिटांवर बारकाईने पाहिल्यावर यात खोडसाळपणा केल्याचे लक्षात येते.