Breaking News

डब्ल्यूपीएलसीत उतरणार नागपुरातील स्ट्रॉगेंस्ट टीन गर्ल

नागपूर, दि. 05, ऑक्टोबर - महिलांनी विविध क्षेत्रात गरुड झेप घेतली असली तरी अनेक क्षेत्र अजूनही पुरुषी वर्चस्वाखाली आहेत. पॉवर लिफटींगचा यात  समावेश करावा लागेल.परंतु, नागपुरातील अल्फिया शेख या तरुणीने या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावत वयाच्या 19 व्या वर्षी तिने 29 सुवर्ण पदकांसह तब्बल 4  वेळा स्ट्रॉगेंस्ट टीन गर्ल्सचा खिताब पटकावला आहे. येत्या 23 ऑक्टोबरपासून दिल्ली येथे सुरू होणार्‍या ’वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन’ (डब्ल्यूपीएलसी) स्पर्धेसाठी  तिची निवड झाली असून महाराष्ट्रातून या स्पर्धेत जाणारी अल्फिया एकमात्र महिला खेळाडू आहे.
वुमन्स पॉवर लिफ्टिंगमधील अल्फिया शेखची कामगिरी दैदिप्यमान राहिली आहे. अवघ्या 19 वर्षीय अल्फियाने आतापर्यंत 29 सुवर्ण पदकं आपल्या नावे केली  आहेत. ज्यात 18 राष्ट्रीय आणि 11 राज्यस्तरीय सुवर्ण पडकांचा समावेश आहे. ती सध्या आगामी 23 ऑक्टोबरपासून दिल्लीत होणार्‍या वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग  चॅम्पियनशिपच्या तयारीला लागली आहे. तिचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे.
नागपुरातील गिट्टीखदान परिसरातल्या दर्शन नगर येथील छोट्याशा घरात अल्फिया तिचे आई-वडील आणि बहिणीसोबत राहते. एकूण चार बहिणींमध्ये अल्फिया  सर्वात लहान आहे. दहावीची परीक्षा दिल्यावर क्रीडा क्षेत्रात काहीतरी मुलीने करावे यासाठी अल्फियाचे वडील हारून शेख यांनी जवळच्या एका जीममध्ये तिला  टाकले आणि इथूनच अल्फियाचा प्रवास सुरू झाला. आगरा येथे 2014 साली आयोजित नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये अल्फियाने गोल्ड मेडल जिंकले  आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही.