Breaking News

पत्नीच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेप

कराड, दि. 6 (प्रतिनिधी) : दोन वर्षांपूर्वी 12 ऑक्टोबर 2014  रोजी रात्री आठ ते नऊच्या सुमारास सुर्लीच्या घाटात पत्नी ज्योती विशाल मोरे (वय 22) हिला दुचाकीवरुन उतरवून दरीत ढकलून दिले. त्यानंतर दरीत जावून तिच्या डोक्यात दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी पती विशाल किसन मोरे (वय 27, रा. शिरगाव, ता. तासगाव, जि. सांगली) यास कराड येथील दुसरे सहाय्यक जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. पी. गड्डम यांनी जन्मठेप तसेच 5 हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली.
ज्योती विशाल मोरे (वय 22, रा. पुणदी, ता. तासगाव, जि. सांगली) हिचे लग्न विशाल किसन मोरे (रा. शिरगाव, ता. तासगाव, जि. सांगली) याच्याशी झाले होते. लग्नानंतर सहा महिने ज्योती सासरी शिरगाव येथे राहिली. त्यानंतर पती विशालबरोबर तो काम करत असलेल्या पुणे येथील ठिकाणी राहण्यास गेली. विशाल याने पुणे येथे भाडोत्री खोली घेतली होती. तो पुणे येथे ज्वेलरी आटणीचे दुकान चालवत होता. ज्योती गणपतीच्या सणासाठी गावी आल्यानंतर तिने तिच्या आईला आपला पती कोणत्यातरी बाईच्या नादाला लागला असून तो रोज दारू पिऊन घरी येऊन मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यानंतर ज्योतीच्या आईने तिची काही दिवसांनी पुन्हा चौकशी केली असता पुन्हा तिने तसेच सांगितले. त्यानंतर दि. 12 ऑक्टोबर 2014 रोजी विशाल याने रात्रीच्या सुमारास ज्योती हीला सुर्लीच्या घाटात तिची हत्या केली. याच दरम्यान पेट्रोलिंगसाठी निघालेले हवालदार प्रशांत विजय तारळकर यांना दरीतून महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. तारळकर यांनी घाटातून जाणार्‍या इतर लोकांच्या मदतीने विशाल यास पकडले. तसेच गंभीर जखमी झालेल्या ज्योती हिस उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. परंतू ज्योतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. लोखंडे यांनी केला. त्यांना अधिकारी आर. बी. घाडगे, हवालदार तारळकर यांनी सहकार्य केले.  खटल्याचे काम सहाय्यक जिल्हा सरकारी वकील मिलिंद वासुदेव कुलकर्णी यांनी पाहिले. त्यांनी 17 साक्षीदार तपासले.  त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन दुसरे सहाय्यक जिल्हा न्यायाधीश सी. पी. गड्डम यांनी विशाल मोरे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.