0
अहमदनगर, दि. 06, ऑक्टोबर - अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढ व आहारशूल्क वाढीसह विविध मागण्यांकडे शासन सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत सर्व मागण्या मान्य कराव्यात,यासाठी अंगणवाडी सेविकांतर्फे जिल्हा परिषदेसमोर आज धरणे आंदोलन  करण्यात आले. यावेळी अंगणवाडी संघटनेच्या अध्यक्षा सुमन सत्रे, राजेंद्र बावळे,बन्सी सातपुते,मदिना शेख ,स्मिता औटी, अनिता पालवे यांसह शेकडो अंगणवाडी  सेविका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
शासनाने नुकतीच अंगणवाडी कर्मचार्‍यांना दिलेली मानधन वाढ अतिशय तुटपुंजी असून ही वेतन वाढ करताना शासनाने वेतनवाढीसाठी गठीत केलेल्या समितीच्या एकही शिफारशींचा यात विचार केलेला नाही. तसेच अंगणवाडी सेविकांच्या  सणार्‍या मागण्या याकडेही दुर्लक्ष करत आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांच्या  11 सप्टेंबर पासून सुरू झालेला संप चालू मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मोर्चाच्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अंगणवाडी सेविकांच्या मानधन ऐवजी वेतनश्रेणी लागू करणे,वेतनवाढ समितीच्या शिफारशी मान्य करणे,अंगणवाडी कर्मचार्‍यांना दरमहा पेन्शन  लागू करणे,प्राथमिक शाळेप्रमाणे एक महिन्याची उन्हाळी सुट्टी देण्यात यावी,मदतनिसाची पदे निर्माण करावीत  आदी मागण्या आहेत.


Post a Comment

 
Top