Breaking News

एल्फिस्टन दुर्घटना : रेल्वे अधिकार्‍यांना क्लीन चिट ही मुंबईकरांची क्रूर थट्टाच - संजय निरुपम

मुंबई, दि. 13, ऑक्टोबर - एल्फिस्टन स्थानकावर झालेल्या दुर्दैवी घटनेत 23 मुंबईकर प्रवासी दगावले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली  होती. या समितीने आपला अहवाल रेल्वे प्रशासनाला सादर केलेला आहे. या अहवालात त्यांनी मुसळधार पावसाला आणि पूल पडला या अफवेला दोषी ठरवलेले आहे आणि त्यांनी  रेल्वे अधिकार्‍यांना क्लीन चिट दिलेली आहे, हि मुंबईकरांची क्रूर थट्टाच आहे. या दुर्दैवी घटनेला सरकार, रेल्वे प्रशासन आणि रेल्वे अधिकारीच जबाबदार आहेत. समितीने चौकशी  करणे हे फक्त नाटक होते. हे सर्व मुंबईकरांना माहित आहे. एल्फिस्टन स्थानकाच्या नवीन ब्रिजसाठी फंड मंजूर झाला होता. पैशाची काहीच कमतरता नव्हती, पण काम करण्याची  सरकारची आणि रेल्वे प्रशासनाची मानसिकता आणि इच्छाशक्ती नव्हती. हा ब्रिज खूपच अरुंद आहे आणि प्रवाशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. दोन ट्रेन एकाच वेळी आल्या  की तिथे चेंगराचेंगरी होते. याबाबत मुंबईकरांकडून अनेक तक्रारी सुद्द्धा करण्यात आल्या होत्या. पण रेल्वे प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे हि दुर्दैवी घटना घडलेली  आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी या चौकशी अहवालावर दिली.
ते पुढे म्हणाले कि जो पर्यंत सर्व दोषींवर कारवाई होत नाही, त्यांना शिक्षा मिळत नाही तो पर्यंत जे 23 प्रवासी या घटनेत दगावलेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही  तसेच त्यांच्या परिवारानाही न्याय मिळणार नाही. दोषी रेल्वे अधिकारयांना क्लीन चिट देणार्‍या या अहवालाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.